सुरुची-कमलजीत यांना नेमबाजीत सुवर्ण
विक्रमी कामगिरीसह भारताला मिळवून दिले दुसरे सुवर्ण, गुलवीर सिंगला रौप्य तर मनप्रीत कौरला कांस्य
वृत्तसंस्था, नागोया : येथे सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताच्या खात्यात शुक्रवारी दुसऱ्या सुवर्णपदकाची भर पडले. नेमबाज सुरुची सिंह आणि कमलजीत यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात दमदार कामगिरी करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. भारतीय जोडीने अंतिम फेरीत 484.6 गुणांची नोंद करत आशियाई विक्रमही प्रस्थापित केला. धावपटू गुलवीर सिंगने 10000 मी. शर्यतीत रौप्य तर महिलांच्या गोळाफेकमध्ये मनप्रीत कौरने कांस्यपदक मिळवित दीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आणली.
सुरुवातीपासूनच भारतीय जोडीने अंतिम फेरीत आघाडी कायम ठेवली. दक्षिण कोरियाच्या चू गाएउन आणि हाँग सुह्यॉन या जोडीने 478.0 गुणांसह रौप्यपदक मिळवले, तर इराणच्या जोडीने 415.8 गुणांसह कांस्यपदक पटकावले. भारताने दक्षिण कोरियावर 6.6 गुणांची आघाडी घेत सुवर्णपदक निश्चित केले.
शेवटच्या क्षणी जोडीमध्ये बदल
या सुवर्णपदकामागे एक महत्त्वाचा निर्णयही ठरला. मिश्र सांघिक स्पर्धेसाठी सुरुची सिंहसोबत सुरुवातीला केदारलिंग बालकृष्ण उचागानवे यांची जोडी निश्चित करण्यात आली होती. मात्र पुरुषांच्या वैयक्तिक पात्रता फेरीत कमलजीतने भारतीय नेमबाजांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत 580 गुण मिळवले आणि नववे स्थान पटकावले. त्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने जोडीमध्ये बदल करून कमलजीतला सुरुचीसोबत संधी दिली. हा निर्णय भारतीय संघासाठी निर्णायक ठरला.
पात्रता फेरीतही अव्वल
सुरुची आणि कमलजीत यांनी अंतिम फेरीपूर्वीच्या पात्रता फेरीतही शानदार कामगिरी केली. भारतीय जोडीने 587 गुण मिळवत अव्वल स्थान मिळवले होते. त्यानंतर अंतिम फेरीतही त्यांनी संयम आणि अचूक नेमबाजी कायम ठेवत 484.6 गुणांची विक्रमी कामगिरी केली. त्यांची ही कामगिरी आधीच्या 481.3 गुणांच्या आशियाई विक्रमापेक्षा 3.3 गुणांनी सरस ठरली.
वैयक्तिक स्पर्धेतील निराशेनंतर सुवर्ण झळाळी
विशेष म्हणजे, दोन्ही खेळाडूंना वैयक्तिक 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत अपेक्षित यश मिळाले नव्हते. सुरुचीला महिला वैयक्तिक पात्रता फेरीत अंतिम फेरी गाठता आली नव्हती, तर कमलजीत केवळ एका गुणाने पुरुषांच्या अंतिम फेरीपासून दूर राहिला होता. मात्र मिश्र सांघिक स्पर्धेत दोघांनी त्या निराशेवर मात करत भारतासाठी सुवर्णपदकाची कामगिरी केली. या स्पर्धेतील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले. यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक जिंकले होते. तसेच नेमबाजीत भारताला यंदाच्या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. सुरुची सिंह आणि कमलजीत यांच्या विक्रमी कामगिरीमुळे भारतीय नेमबाजी पथकाला मोठा आत्मविश्वास मिळाला आहे.
गुलवीर सिंगला 10 हजार मी.मध्ये रौप्य
भारताचा लांब पल्ल्याचा धावपटू गुलवीर सिंगने आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपली उत्कृष्ट कामगिरी कायम राखत पुरुषांच्या 10,000 मी. शर्यतीत 28:29.38 मिनिटे वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले. मागील आशियाई स्पर्धेत त्याने कांस्यपदक मिळविले होते. त्याने बहरिनच्या बिरहान बालेवच्या मागे राहत दुसरे स्थान मिळविले. बालेवने 28:27.51 मिनिटांत शर्यत पूर्ण करून सुवर्ण मिळविले. बहरिनच्याच अल्बर्ट किप्टोने 28:34.18 मिनिटे वेळ नोंदवत कांस्य मिळविले. यावर्षी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीरने 10000 मी. मध्ये रौप्य व 5000 मी. कांस्यपदक जिंकले होते.
महिला गोळाफेकमध्ये मनप्रीतला कांस्य
भारताच्या मनप्रीत कौरने महिलांच्या गोळाफेक प्रकारात 17.17 मी. गोळाफेक करीत कांस्यपदक पटकावून भारताची या प्रकारातील पदकांची प्रतीक्षा संपुष्टात आणली. या स्पर्धेत चीनच्या सोंग जियायुआन (19.40 मी.), झांग लिनरू (18.14 मी.) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकावले. यापूर्वी 36 वर्षीय मनप्रीतने 2023 आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक सर्वोत्तम कामगिरी केली होती. तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 18.06 मी. 2022 मध्ये नोंदवली गेली होती.