For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोने घसरले, चांदी गडगडली

06:46 AM Feb 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
सोने घसरले  चांदी गडगडली
Advertisement

चांदीचा भाव सर्वकालीन उच्चांकावरून एक लाखांनी घसरला

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

गेल्या दोन दिवसांपासून जगभरातील बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या किमती झपाट्याने घसरत आहेत. शनिवार, 31 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या. शुक्रवारपासून मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी उलथापालथ झाली. विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोने आणि चांदीच्या किमती दोन दिवसात झपाट्याने घसरल्या. चांदीचे दर प्रतिकिलो 1,00,000 पेक्षा जास्त रुपयांनी गडगडले असून सोने देखील प्रति 10 ग्रॅम 33,000 रुपयांपेक्षा जास्त घसरले.

Advertisement

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर चांदीने इतिहासात प्रथमच 4,00,000 रुपये प्रतिकिलोचा टप्पा ओलांडला. गुरुवारी, चांदीने प्रतिकिलो 4,20,048 चा विक्रमी उच्चांक गाठला, परंतु शुक्रवारी, फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये मोठी घसरण दिसून आली. 5 मार्च रोजी एक्सपायरी असलेली चांदीची किंमत एकाच दिवसात प्रतिकिलो 1,07,971 रुपयांनी कमी झाली. त्यानंतरही ही घसरण सुरूच होती. या घसरणीनंतर गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का बसला. सध्या देशात वेगवेगळ्या भागात या मौल्यवान धातूंचे दर वेगवेगळे असले तरी चांदी दर प्रतिकिलो साडेतीन लाख रुपये आणि सोनेदर प्रतितोळा दीड लाखांच्या जवळपास असल्याचे सांगण्यात आले.

सोन्यातही 40 हजार रुपयांपेक्षा जास्त घसरण

चांदीसोबतच सोन्याच्या किमतीतही मोठी घसरण झाली. एमसीएक्सवर 2 एप्रिलची एक्सपायरी डेट असलेले 24 कॅरेट सोने गुरुवारी प्रति 10 ग्रॅम 1,83,962 रुपयांवर बंद झाले. शुक्रवारी व्यवहार संपेपर्यंत ते प्रति 10 ग्रॅम 1,50,849 रुपयांवर घसरले होते. याचा अर्थ एका दिवसात सोने प्रति 10 ग्रॅम 33,113 रुपयांनी घसरले. त्यानंतर झालेल्या तीव्र घसरणीमुळे सोने सर्वोच्च पातळीवरून 42,247 रुपयांनी घसरले आहे.

अर्थसंकल्पात काय होणार?

सोने आणि चांदीच्या किमती गेल्या काही दिवसात रॉकेटच्या वेगाने वाढल्या असताना अर्थसंकल्पापूर्वीच्या त्यांच्या सर्वकालीन उच्चांकावरून लक्षणीयरित्या घसरल्या आहेत. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवार, 1 फेब्रुवारी रोजी सोन्याशी संबंधित काही मोठ्या घोषणा करतील का? याची सर्वांना उत्सुकता आहे.

गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का

या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत झालेल्या तीव्र घसरणीमुळे गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एमसीएक्स गोल्ड फेब्रुवारी फ्युचर्समध्ये 9 टक्के आणि मार्च सिल्व्हर फ्युचर्समध्ये 25 टक्क्यांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर सर्वांचे लक्ष आता सोन्याच्या नवीन श्रेणीवर आहे.

सोन्यासाठी 1,45,000 ते 1,50,000 रुपयांची पातळी एक मजबूत आधार क्षेत्र ठरू शकते, असे तज्ञांचे मत आहे. या पातळीवरून हे दर पुन्हा वाढण्याची अपेक्षा आहे. औद्योगिक मागणी आणि मध्यवर्ती बँकेच्या खरेदीमुळे चांदी 3.10 लाख रुपयांच्या जवळ येताच बाजारात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यास ती 3.50 लाखांच्या पुढे जाण्याची क्षमता आहे. ही घसरण गुंतवणूकदारांसाठी संधी असून भविष्यात विक्रमी तेजीची चिन्हे आहेत.

Advertisement
Tags :

.