गोल्ड ईटीएफमध्ये आठवड्यात 3.1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
14 मार्चच्या आठवड्यात झाली गुंतवणूक : फेब्रुवारीतही वाढली गुंतवणूक
नवी दिल्ली :
सोन्याच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असून यातील ईटीएफमध्ये गेल्या आठ आठवड्यात सातत्याने गुंतवणूक होताना दिसते आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या माहितीनुसार 14 मार्चला संपलेल्या आठवड्यात जागतिक स्तरावर गोल्ड ईटीएफ मध्ये 3.1 अब्ज डॉलर्स इतकी रक्कम गुंतवली गेली आहे.
सोन्याच्या किमतीत झालेली वाढ आणि त्याचप्रमाणे आलेली गुंतवणूक पाहता 21 मार्चपर्यंत गोल्ड ईटीएफची एयुएम (व्यवस्थापनअंतर्गत स्थावर मालमत्ता) विक्रमी 332.4 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. या महिन्यामध्ये 21 मार्चपर्यंत पाहता गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफमध्ये जवळपास 6.6 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.
फेब्रुवारीत किती गुंतवणूक
गोल्ड ईटीएफ हा गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित पर्याय दिसून आला आहे. प्रत्यक्ष सोन्याच्या खरेदीऐवजी यामध्ये गुंतवणूक वाढताना दिसते आहे. मागच्या फेब्रुवारी महिन्यातदेखील गोल्ड ईटीएफमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली दिसून आली. जवळपास 9.4 अब्ज डॉलरची गुंतवणूक यामध्ये झाली होती.