For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आझमनगरात भरदिवसा वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास

12:36 PM Jul 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
आझमनगरात भरदिवसा वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास
Advertisement

मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांचे कृत्य : महिलावर्गात भीतीचे वातावरण

Advertisement

बेळगाव : नातवासोबत चालत जाणाऱ्या 75 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सुमारे 3.50 लाख रुपये किमतीची 32 ग्रॅमची सोनसाखळी दोघा भामट्यांनी पळविली आहे. मंगळवारी आझमनगर येथे भरदुपारी ही घटना घडली असून पद्मजा मधुसुदन कुलकर्णी रा. आझमनगर असे सोनसाखळी पळविण्यात आलेल्या वृद्धेचे नाव आहे. ऐन नागपंचमीच्या सणादिवशीच घडलेल्या या घटनेमुळे महिलावर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनेची नोंद एपीएमसी पोलीस स्थानकात झाली आहे. याबाबत पोलिसांतून व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, पद्मजा या मंगळवारी दुपारी 3.30 ते 4 च्या दरम्यान आपल्या नातवासोबत घराबाहेर पडल्या. नातू सायकलवर तर त्या त्याच्यासोबत रस्त्याच्या कडेने पायी चालत जात होत्या. नातू सायकलवरून खाली उतरतो असे म्हणत होता. पण त्या ठिकाणी कुत्रा असल्याने आजीने नातवाला खाली उतरण्यास मज्जाव करत ओढून नेण्याचा प्रयत्न करीत होती.

तितक्यात मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी तिला कांही कळण्याआधीच गळ्यातील सुमारे 3.50 लाख रुपये किमतीची 32 ग्रॅमची सोनसाखळी हिसडा मारून हिसकावून घेत पलायन केले. घटना घडताच पद्मजा यांनी ओरडाओरड केली मात्र भामट्यांनी बॉक्साईड रोडच्या दिशेने धूम ठोकली. ओरडाओरड झाल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. ही माहिती समजताच एपीएमसी पोलिसांनी अझमनगरकडे धाव घेतली. घडलेल्या घटनेबाबतची माहिती जाणून घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेतले आहे. भामट्यांनी सोनसाखळी लांबविण्यासाठी जोरदार हिसडा मारल्याने पद्मजा तोल जाऊन खाली कोसळल्या. त्यामुळे त्यांच्या गळ्याला आणि गुडघ्याला दुखापत झाली. ऐन नागपंचमी दिवशीच भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे महिलांवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक उस्मान अवटी व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

चोरटे 20 ते 30 वयोगटातील

पद्मजा यांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविणारे चोरटे अंदाजे 20 ते 30 वर्षीय वयोगटातील असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. सोनसाखळी लांबविण्यासाठी आलेल्या भामट्यांनी डोकीवर हेल्मेट आणि तोंडावर मास्कदेखील घातला नव्हता, असे पोलिसांनी सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास चक्रे गतीमान केली आहेत.

Advertisement
Tags :

.