Islampur News | ईश्वरपुरात ज्येष्ठ नागरिकाची चेन पळवणारी 'हिसडा टोळी' गजाआड; ७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!
ईश्वरपूर: माळ गल्लीतील नारायण बंडू माळी (७८) यांच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास करणाऱ्या हिसडा टोळीतील चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सब्बा पाच लाखांच्या चेनसह दोन दुचाकी, मोबाईल असा सात लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
अविनाश परशुराम भारसकले, शिवराज दशरथ कुचिकोबी, विनोद रामचंद्र मुळके (तिघे रा.९० फुटी रस्ता, रस्ता, सायन, धाराबी झोपडपट्टी), अमोल संकाप्पा कुचीवाले (रा. माकडवाले गल्ली, ईश्वरपूर) अशी आरोपींची नावे आहेत.
नारायण माळी व त्यांच्या पत्नी राधा हे दि. ७ जून रोजी मॉर्निंग बॉकसाठी घराबाहेर पडले होते. दरम्यान ते उपजिल्हा रुग्णालय परिसरातील अग्निशमन कार्यालया समोर आले असता, चौघेजणमोटारसायकलवरुन आले. त्यातील एकाने माळी यांचे दोन्ही हात पाठीमागे धरुन ठेवले. तर एकाने गळ्यातील चेन हिसडा मारुन काढली. ते मोटारसायकल वरुन पलायन करीत होते.
दरम्यान माळी व त्यांचे मित्र अतुल सुर्यवंशी यांनी त्यांचा पाठलाग केला. दरम्यान त्यांनी नागरिक व पोलिसांच्या मदतीने भारसकले यास पकडले. त्याच्याकडून पोलिसांना अन्य आरोपींची नावे मिळाली. त्यांनी अन्य आरोपींना अटक केली.
पोलीस उपधिक्षक अरुण पाटील व पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसउपनिरीक्षक समाधान घुगे, पोलीस कॉन्स्टेबल कुबेर खोत, विशाल पांग, शशिकांत शिंदे, अमोल सावंत, दिपक घस्ते, सुशिल पाटील, चंद्रकांत बंजारी, वैभव जाधव, हवालदार जयकर सुतार यांनी ही कारवाई केली. या आरोपींना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर तपासात सोन्याच्या चेन सह दोन दुचाकी, मोबाईल हस्तगत केले.
या गुन्ह्यातील विनोद मुळके हा आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याबर सन २०२२ मध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती.