विक्रमी पातळीवरून सोने-चांदी दर ‘धडाम’
चांदी दरात 80 हजार तर सोन्याच्या किमतीत 10 हजारांपर्यंत घट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एका दिवसापूर्वीच विक्रम प्रस्थापित करणारे चांदी आणि सोने अवघ्या 24 तासांत कोसळले. गुरुवारी 4 लाख रुपयांची ऐतिहासिक पातळी ओलांडलेल्या चांदीच्या किमती शुक्रवारी जवळपास 80 ते 85 हजार रुपयांनी घसरल्या, तर शुक्रवारी संध्याकाळी सोन्याचे तेजही जवळजवळ 10,000 रुपयांनी कमी झाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हच्या आगामी अध्यक्षांच्या नावाची घोषणा केल्यानंतर सोने-चांदी बाजारातील दरांचा बुडबुडा फुटल्याचे मानले जात आहे. तथापि, त्यामागे इतर अनेक कारणे असल्याचेही तज्ञांचे मत आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केविन वॉर्श यांची फेडरल रिझर्व्हचे पुढचे प्रमुख म्हणून घोषणा केली. ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये केविन वॉर्श यांचे कौतुक करताना त्यांना ‘महान’ असे संबोधत ते कधीही गुंतवणूकदारांना निराश करणार नाहीत असे म्हटले. केविन वॉर्श यांनी यापूर्वी फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर म्हणून काम केले आहे. फेडरल रिझर्व्हचे पुढचे प्रमुख म्हणून केविन वॉर्श यांची नियुक्ती झाल्याच्या बातमीनंतर डॉलर निर्देशांकही मजबूत होऊ लागला. त्यानंतर गुंतवणूकदारांनी मौल्यवान धातूंमधून पैसे काढून शेअर बाजार आणि डॉलरमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. तसेच सराफा बाजाराचा बुडबुडा कमी होऊ लागल्याचे दिसून येत आहे.
सोन्याच्या किमतीत घसरण
इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता जाहीर केलेल्या किमतींनुसार गेल्या 24 तासांत 24 कॅरेट सोन्याचा भाव 9,545 रुपयांनी घसरून 1,65,795 रुपये प्रतितोळा झाला आहे. सोन्याच्या वायद्यातही घसरण दिसून आली. फेब्रुवारीच्या करारातील सोन्याच्या किमती 15,246 रुपयांनी किंवा जवळपास 9 टक्क्यांनी घसरून 1,54,157 रुपये प्रतितोळा झाल्या. यापूर्वी गुरुवारी हा दर 1,80,779 रुपयांच्या उच्चांकी पातळीपर्यंत पोहोचला होता.
चांदीचा दरही गडगडला
सोन्यासोबतच चांदीच्या किमतीत शुक्रवारी मोठी घसरण झाली. चांदीच्या किमती 24 तासात जवळपास 85,000 ने घसरल्या. चांदीचे दर प्रतिकिलो 4.20 लाखांच्या वर गेल्यानंतर ही घट झाली आहे. शुक्रवारी दुपारी 3:30 वाजता, एमसीएक्सवर मार्च फ्युचर्ससाठी 1 किलो चांदीची किंमत अंदाजे 65,000 ने घसरून 3,35,001 वर आली होती. परिणामी, चांदीच्या किमती अवघ्या 24 तासांत अंदाजे 85,000 रुपयांनी घसरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदी आणि इतर धातूंच्या किमती कमी झाल्यामुळे भारतातील एमसीएक्सवरील किमती कमी झाल्या.