रिक्षात विसरलेले सोने-रोख रक्कम परत
रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा
त.भा.प्रतिनिधी
खानापूर: आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी वाटणाऱ्या काळातही प्रामाणिकपणा जिवंत आहे, याची जाणीव करून देणारी एक हृदयस्पर्शी घटना शनिवारी खानापूरमध्ये घडली. एका रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे एका महिलेचे मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम सुरक्षित परत मिळाली आणि माणुसकीवरील विश्वास अधिक दृढ झाला.
याबाबत माहिती अशी की, शुक्रवार दि. 1 मे रोजी पुण्याहून आपल्या मूळ गावी करंबळ येथे विवाह निमित्ताने आलेल्या राजश्री सुभाष मनोळकर या सायंकाळी खानापूर येथे उतरल्या. राजा शिवछत्रपती चौकातून आपल्या गावी करंबळ येथे जाण्यासाठी त्यांनी रिक्षा केली. या रिक्षामध्ये तीन महिला आणि दोन मुले बसली होती. मात्र प्रवासाच्या गडबडीत राजश्री यांनी पर्स रिक्षामध्येच विसरून गेल्या.
दरम्यान, रिक्षाचालक सहदेव सोमाना मोरे (रा. असोगा) यांनी रात्री घरी परतल्यानंतर नेहमीप्रमाणे रिक्षा स्वच्छ करत असताना त्यांना रिक्षात पर्स सापडली. पर्स उघडून पाहिल्यावर त्यामध्ये दीड तोळ्याचा हार व रोख रक्कम असल्याचे दिसून आले. कोणताही मोह किंवा स्वार्थ न बाळगता त्यांनी तत्काळ त्या पर्सच्या मालकिणीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. अखेर त्यांनी करंबळ येथे असलेल्या राजश्री मनोळकर यांच्याशी संपर्क साधत पर्स सापडल्याची माहिती दिली.
दरम्यान, पर्स हरवल्याचे लक्षात आल्यानंतर मनोळकर कुटुंबीयांची मोठी धांदल उडाली होती. घरभर शोधाशोध सुरू होती आणि मनात अनेक शंका निर्माण झाल्या होत्या. अशातच सहदेव मोरे यांचा फोन आला आणि ‘आपली पर्स सुरक्षित आहे‘“ हे ऐकताच त्यांच्या मनावरील मोठे ओझे हलके झाले.
शनिवारी सकाळी रिक्षास्टँडवर येऊन ओळख पटवून पर्स परत घेण्यास सांगण्यात आले. त्यानुसार राजश्री मनोळकर व त्यांच्या पतींनी शिवछत्रपती चौकात येऊन पर्स व त्यातील सर्व मुद्देमालाची खात्री करून घेतली. सर्व वस्तू जशाच्या तशा परत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी रिक्षाचालक सहदेव मोरे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे मनापासून आभार मानण्यात आले. याप्रसंगी रिक्षा संघटनेचे सदस्य दत्ता वंजारे, शंकर चौगुले, बाळू जांभळे व इतर रिक्षाचालक उपस्थित होते.