गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्यानं जनावरांना विषबाधा
कोल्हापूर
गोकुळ दूधसंघातर्फे पुरविण्यात येणाऱ्या महालक्ष्मी पशुखाद्यानं जनावरांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. कागल तालुक्यातील कुरुकली आणि बानगे य़ा गावात ही घटना घडली असून ३० हून अधिक जनावरे बाधित झाली आहेत. तर यापैकी 4 ते 5 जनावरे दगावल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, गोकुळमार्फत दूध संस्थाना दिलेल्या पशुखाद्याने या दोन्ही गावातील जनावरं एका आठवड्यापासून आजारी आहेत. गोकुळ दूध संघाकडून बाधित जनावरांची तपासणी सुरू आहे. बाधित जनावरांना ताप, अशक्तपणाची लक्षणं दिसून येत होती. संशयास्पद पशुखाद्य गोकुळ प्रशासनाकडून ताब्यात घेण्य़ात आले आहे. पशुखाद्याचे नमुने तपासणीसाठी मुंबई इथल्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहे. बाधित आणि मृत जनावरांची भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
याविषयी विचारणा झाली असता, शेतकरी सचिन कवडे म्हणाले, आम्ही महालक्ष्मी पशुखाद्य जनावरांसाठी सातत्याने वापरतो. गेले ८ ते १० दिवस झाले हे पशु खाद्य दिल्यानंतर आमच्या जनावरांच्या पायातील ताकद कमी झाली आहे. त्यांना चालता येत नाही आहे. पायाला लकवा मारल्याप्रमाणे अवस्था झाली आहे. यावर खासगी डॉक्टरना बोलवून जनावरांच्यावर उपचार सुरु केले आहेत. आत्तापर्यंत आम्ही ८ ते १० हजार रुपये बाधित जनावरांच्या उपचारासाठी खर्च केले आहेत. तसेच गोकुळ दूधसंघातर्फे आता उपचार सुरु आहेत. अजून जनावरांना चालत येत नाही आहे, वैरण खात नाही आहेत, अशी माहिती शेतकरी सचिन दत्तात्रय कवडे यांनी दिली. त्यांच्या म्हैशींना पशुखाद्यातून विषबाधा झाली आहे.
यावर बानगे येथील श्री हनुमान दूध संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सावंत म्हणाले, गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याची ७० पोती आमच्याकडे ३० डीसेंबर रोजी आली होती. त्यापैकी आम्ही त्यापैकी जवळजवळ ५५ पोती विकली. त्यापैकी ५५ पैकी जवळजवळ ४० जनावरांना लागण झाली आहे. त्यापैकी रोगप्रतिकार शक्ती चांगली असलेली जनावरं तग धरून आहेत. तर अनेक जनावर आजारी आहेत. ज्या जनावरांना फक्त गोळीचा वापर केला आहे त्याच जनावरांची तक्रार आहे. त्यातही ज्यांना पशुखाद्य देण्यात आले आहे, त्याच जनावरांना लागण झाली आहे. हे पशुखाद्या आमच्या गावासह ज्या ज्या ठिकाणी देण्यात आले आहे, तेथील जनावरांची चौकशी करता त्यांनाही अशीच लागण झाली आहे. तर काही जनावरे दगावली आहेत. या पशुखाद्यामुळे आमचे जे नुकसान झाले आहे, त्याची नुकसान भरपाई गोकुळ दूधसंघाने द्यावी अशी मागणी केली आहे.
गावातील म्हैशींच्या पायाला लकवा मारल्यासारथी परिस्थिती झालेली आहे. यांसह कुरुकली येथील चार ते पाच जनावरं दगावली आहेत. गोकुळ दुधसंघातर्फे आलेल्या महालक्ष्मी पशुखाद्यानेच जनावरांची ही अवस्था झाली आहे. बाधित जनवारे वैरण खात नाही आहे. जागेची उठत नाही आहेत. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे. तरी गोकुळ दुध संघाने याची नोंद घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी केली आहे.