Kolhapur : 'गोकुळ'चे संचालक मंडळ आता 25 सदस्यांचे होणार!
गोकुळ मंडळात वाढणार सदस्यसंख्या
कोल्हापूर : 'गोकुळ'च्या संचालक मंडळात चार नवीन सदस्यांची वाढ होणार आहे. यामुळे मंडळातील सदस्य संख्या २१ वरून आता २५ इतकी होणार आहे. सत्तारूढ आघाडीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या पोटनियम दुरुस्तीला शासनाची मंजुरी मिळवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे येत्या 'गोकुळ' निवडणुकीनंतर तब्बल जम्बो संचालक मंडळ आकाराला येणार आहे.
या निर्णयानंतर राजकीय हालचालींनाही वेग आला होता. महाडिक गटाची 'एनओसी' मिळाल्यानंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोटनियम दुरुस्तीचा मार्ग मोकळा केल्याचे समजते. याआधी मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार अमल महाडिक यांच्यात 'गोकुळ' निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. गेल्या ९ सप्टेंबरला झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वसाधारण गटातील चार संचालक वाढविण्याचा ठराव सत्तारूढ आघाडीने मंजूर केला होता. याला महाडिक गटातील संचालिका शौमिका महाडिक यांनी विरोध दर्शविला होता. मात्र, २० विरुद्ध १ मतांनी हा ठराव पारित करण्यात आला.
त्यानंतर वार्षिक सभेतही याला विरोध झाला, तरी आवाजी मतदानाद्वारे ठराव मंजूर करण्यात आला. पोटनियम दुरुस्तीला शासनाची अंतिम मंजुरी ६० दिवसांत घेणे आवश्यक होते; परंतु महाडिक गटाच्या हस्तक्षेपामुळे प्रक्रिया काही काळ रखडली. अखेर चर्चेनंतर शासनाने मंजुरी दिली आहे.
गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळातील निर्वाचित संचालकांची संख्या २१ असून, त्यामध्ये १६ जागा सर्वसाधारण तर ५ जागा राखीव प्रवर्गातील आहेत. यामध्ये नव्या पोटनियम दुरुस्तीप्रमाणे सर्वसाधारण जागांची संख्या २० अधिक आरक्षित ५ अशी निर्वाचित संचालकांची संख्या २५ होणार आहे. त्यात संचालक मंडळातर्फे स्वीकृत २, शासन नियुक्त १ अशा ३ संचालकांची अशा प्रकारे, आगामी निवडणुकीनंतर 'गोकुळ'चे २८ सदस्यांचे संचालक मंडळ अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीची समीकरणे पूर्णतः बदलण्याची शक्यता आहे.