सोलापुरात थकीत ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांचा उद्रेक; गोकुळ शुगरविरोधात झाडावर चढून आंदोलन
सोलापूर : प्रतिनिधी : गोकुळ शुगरकडून थकीत ऊस बिलांची रक्कम मिळत नसल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी सोलापुरात झाडावर चढून आंदोलन केले. थकीत बिलांची रक्कम मिळेपर्यंत झाडावरून खाली उतरणार नाही, अशी आक्रमक भूमिका आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घेतल्याने प्रशासनाची धावपळ उडाली.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सन 2023 ते 2025 या कालावधीतील सुमारे 270 शेतकऱ्यांची 1 कोटी 97 लाख रुपयांची ऊस बिलांची थकबाकी असल्याचा दावा करण्यात आला आहे. या थकीत रकमेबाबत साखर आयुक्तालय आणि जिल्हा प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
‘लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही’
“कारखान्याने आमचा ऊस नेला, साखर विकली; मात्र शेतकऱ्यांचे पैसे वर्षानुवर्षे अडकवून ठेवले आहेत. बँकांचे कर्ज, मुलांचे शिक्षण आणि संसाराचा खर्च भागवणे कठीण झाले आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून शेतकऱ्यांची थकीत रक्कम खात्यावर जमा करावी,” अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
थकीत बिलांबाबत ठोस लेखी आश्वासन आणि कायदेशीर कारवाईची हमी मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
प्रशासनाकडून आंदोलन थांबवण्याचे प्रयत्न
शेतकरी झाडावर चढल्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तहसीलदार किरण जमदाडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनीही शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र ठोस लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला.
या आंदोलनात ॲड. अमोल पाटील (वागदरी), अरविंद घोडके (अणदूर), हनुमंत बिराजदार, भीमाशंकर आलुरे, काशिनाथ माने, अभिजीत सावळी, मल्लिनाथ शीलवंत, शरणाप्पा नागूर यांच्यासह अन्य शेतकरी सहभागी झाले होते.
थकीत ऊस बिलांच्या प्रश्नावरून झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, या मागणीला जिल्ह्यातील इतर शेतकरी संघटनांनीही पाठिंबा दर्शविल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले.