Gokul Shirgaon: चित्रनगरीच्या आधी शूटींगसाठी प्रसिद्ध असणारा 'श्रीकृष्णाचा डोह'
चित्रनगरी व्हायच्या आधी असंख्य चित्रपटाचे शूटिंग या ठिकाणी झाले
By : शहाजी पाटील
गोकुळ शिरगांव : श्रीकृष्ण मंदिराजवळ पाण्याचा डोह, कोसळणारा धबधबा आजही सगळ्यांचे मन हिरावून घेणार आहे . निसर्गरम्य वातावरण व चित्रीकरणासाठी असणारी बॅगग्राऊंड सर्वानाच या ठिकाणी मोहात पाडत होती म्हणूनच त्याकाळी मोठा धबधबा म्हणून गोकुळ शिरगाव येथील श्रीकृष्णाचा डोह प्रसिद्ध होता. व आजही त्याची ख्याती आहे तशीच आहे.
चित्रनगरी व्हायच्या आधी असंख्य चित्रपटाचे शूटिंग या ठिकाणी झाले आहे. पण 90 नंतर मात्र इकडे फारसे कोणी फिरकले नाही असे इथले लोक आता सांगत आहेत. चित्रनगरी व्हायच्या आधी या गावांमध्ये सतत शूटिंग व्हायची कारण या ठिकाणी पूर्ण परिसर मोकळा होता.
एखाद्या बैलगाडीतून किंवा माहेरीन गावी जात असलेले शूटिंग या ठिकाणी बरीच झालेली आहेत.पाण्याचा डोह व धबधबा असल्याने या डोहाच्या शेजारी गाण्याचे चित्रीकरण सुद्धा झालेले आहे. शिवाय बाजूलाच एक मोठी विहीर आहे त्यामध्ये अभिनेत्री उडी मारण्याचे चित्रीकरण सुद्धा या ठिकाणी झालेले आहे.
आज 90 च्या दशकातला एखादा चित्रपट टीव्हीला लागला तर या गावातील लोकांच्या या ठिकाणच्या आठवणी जाग्या होतात व आपल्या गावात या चित्रपटाचे शूटिंग झालेले नव्या पिढीला सांगतात. 90 च्या आधी या गावांमध्ये भालू, पाहुणी, शुभ बोल नाऱ्या, पाटलीन, पूर्ण सत्य, इरसाल कार्टी, बाल शिवाजी, हेच माझे माहेर, सुळावरची पोळी, निखारे ,असला नवरा नको ग बाई असे अनेक असंख्य दिग्गज व नावजलेले चित्रपटांचे शूटिंग या ठिकाणी झाले आहे.
त्यावेळी राजा गोसावी, निळू फुले, दादा कोंडके, अशोक सराफ, कुलदीप पवार, लक्ष्मीकांत बेर्डे, रंजना ,अलका कुबल, उषा नाईक, सचिन पिळगावकर अशा अनेक दिग्गज कलाकारांनी या ठिकाणी चित्रपटाची शूटिंग केलेली आहेत.या गावाबरोबर त्याचे नातेही जोडले होते असे या ठिकाणचे लोक सध्या सांगत आहेत.
90 च्या पूर्वी आमच्या गावामध्ये मोठे हिरो व हिरोईन येऊन शूटिंग करून गेले आहेत. बऱ्याच वेळेला एक महिना या ठिकाणी सर्व टीम थांबली आहे. त्यामुळेच ही जागा शूटिंगसाठी त्याकाळी खूप प्रसिद्ध होती .आता या ठिकाणी घरे,वस्ती मोठी झाल्याने शूटिंगसाठी कोणी येत नाही.
- कृष्णात शंकर पाटील, ग्रामस्थ, गोकुळ शिरगाव