गोकुळ शिरगावमधील गोवर्धन पर्वत, यमुनाकाठी अवतरले श्रीकृष्णाचे गोकुळ
मंदिराला लागूनच अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगराला गोवर्धन पर्वत म्हणून ओळखतात
By : मालोजी पाटील
कोल्हापूर (गोकुळ शिरगाव) : भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलून मुसळधार पावसापासून गोकुळवासीयांचे संरक्षण केले होते. असाच पर्वत कोल्हापूरजवळील गोकुळ-शिरगावच्या हद्दीत आहे. पावसाने दडी मारल्यास ’पाळक दिन’ साजरा करून गावकरी या गोवर्धन पर्वताची प्रार्थना करतात. यावेळी पाणी घातल्याने पाऊस पडतो, अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. या ठिकाणी गोकूळ दूध डेअरी उभी राहिल्याने शेतकऱ्यांच्या घरात भरले गोकुळ नांदू लागले आहे.
पुणे-बेंगलोर महामार्गावरील शिरगावाला भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचा संदर्भ आहे. त्यामुळेच या गावाला गोकुळ शिरगाव असे नाव पडल्याचे जुने-जाणते ग्रामस्थ सांगतात. त्याबाबतच्या आख्यायिकाही या ठिकाणी ऐकायला मिळतात. करवीर महात्म्य ग्रंथात तसा स्पष्ट उल्लेख आहे. पुणे-बेंगलोर महामार्गापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील या जागेत श्रीकृष्ण मंदिर उभे आहे. हे मंदिर हजारो वर्षांपासून वसलेले आहे, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. येथील काळ्या पाषाणावर भगवान श्रीकृष्णाची चिमुकली पावले स्पष्टपणे उमटलेली दिसतात. तसेच श्रीकृष्णाने गोपिकांसोबत केलेल्या नृत्याच्याही पाऊलखुणा दिसतात.
येथे गाईच्या पायांचे खूर आणि भगवान श्रीकृष्णांच्या पायांचे ठसे ठळकपणे दिसतात. या ठिकाणाला लागूनच असलेला ’कालिया मर्दन’ डोह सर्वांचे लक्ष वेधून घेतो. बाजूलाच कदंबाचा भला मोठ्ठा प्राचीन वृक्ष आहे. येथील वारकरी आणि गावकरी त्याबद्दल माहिती देतात. या मंदिराला लागूनच अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर भला मोठा डोंगर आहे. हा डोंगर गोवर्धन पर्वत म्हणून ओळखला जातो. श्रीकृष्णाच्या पूजेबरोबरच या पर्वतावर असलेल्या छोट्याशा मंदिराची सुद्धा नेहमी पूजा केली जाते.
त्याचबरोबर या ठिकाणी एक निशाण लावले आहे. हे निशाण नेहमी फडकत असल्याचे पाहायला मिळते. आजही गावावर कोणतेही संकट आले, तर ग्रामस्थ गोवर्धन पर्वताकडे धाव घेतात. या पर्वताला साकडे घालतात. भगवान श्रीकृष्णांनी केलेल्या रासलीला आपण सातत्याने ऐकतो. त्या त्यांच्या रासलीलीचे ठिकाण प्रत्यक्षात कसे असेल, याची अनुभूती हे ठिकाण पाहिल्यावर येते. खुद्द भगवान श्रीकृष्ण येथे नक्कीच येऊन गेले असतील, असे हे रमणीय ठिकाण आहे. श्रीकृष्णाच्या पौराणिक कथेचा उल्लेख करवीर महात्म्यातही वाचायला मिळतो. त्या वर्णनाबरहुकूम हे ठिकाण पाहायला मिळते.
भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला शिरगावच्या ग्रामस्थांनी गोकुळ शिरगाव हे नाव दिले आहे. संपूर्ण देशभर नाव कमावलेल्या येथील गोकुळ दूध संघाला भगवान श्रीकृष्ण आणि येथील गोवर्धन पर्वताचा कृपाशिर्वाद असल्याची भावना गोकुळ शिरगाववासीयांची आहे. या डोंगरावरून चारही बाजूंची गावे पाहायला मिळतात. एकूणच गोकुळ शिरगाव आणि परिसरातील संपूर्ण गावांसाठी गोवर्धन पर्वत जणू आशीर्वाद देत भक्कमपणे पाठीशी उभा आहे.
कणेरी मठ आणि कंदलगाव या गावांच्या सीमेवरचा डोंगर
- गावावर काही संकट आल्यास ग्रामस्थांची पर्वताकडे धाव
- पावसाने दडी मारल्यास येथे पाणी घातल्याने पाऊस पडतो, अशी ग्रामस्थांची धारणा
- डोंगरालगत नदीच्या काठावर उभे आहे श्रीकृष्णाचे मंदिर