For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोकुळच्या छाननीत ५८ अर्ज बाद; अंतिम पात्र-अपात्र यादी आज अकरा वाजता जाहीर होणार

09:09 AM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोकुळच्या छाननीत ५८ अर्ज बाद  अंतिम पात्र अपात्र यादी आज अकरा वाजता जाहीर होणार
Advertisement

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीत बुधवारी प्राथमिक टप्यात तब्बल संभाव्य ५८ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याची माहिती समोर आली आहे. गोकुळच्या पोटनियमांमधील विविध अटींची पूर्तता न झाल्याने हे अर्ज बाद करण्यात आल्याचे समजते. मात्र, काही उमेदवारांनी अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी वेळ मागितल्याने अंतिम पात्र-अपात्र यादीबाबत उत्सुकता वाढली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले गुरुवारी (दि. २४) सकाळी ११ अधिकृत यादी जाहीर करणार आहेत.

Advertisement

रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये ३०१ उमेदवारांचे तब्बल ४३६ अर्ज निवडणूक कार्यालयाकडे प्राप्त झाले होते. या सर्व अर्जाची बुधवारी छाननी करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, सर्वसाधारण गटातील १८, इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि महिला राखीव गटातील प्रत्येकी १५, तर अनुसूचित जाती आणि भटक्या-विमुक्त गटातील प्रत्येकी पाच उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. अर्जातील दूध पुरवठा, संस्थेचे ठराव, अनुक्रमांक तसेच गोकुळच्या पोटनियमांतील पात्रतेच्या अटींची पूर्तता झाली आहे का, याची छाननी करण्यात आली.

मात्र, छाननीदरम्यान काही उमेदवारांनी कागदपत्रे आणि अर्जातील त्रुटींबाबत स्पष्टीकरण देत त्या दुरुस्त करण्यासाठी वेळ मागितला आहे. त्यामुळे बुधवारी प्राथमिक पातळीवर अवैध ठरलेले सर्व अर्ज अंतिमतः बादच होतील का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. गुरुवारी जाहीर होणाऱ्या यादीत याचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे.

Advertisement

जाधवांचा जनरल अर्ज बाद, ओबीसी अर्ज वैध
गोकुळ निवडणुकीच्या छाननीत शिवसेनेचे उमेदवार गोकुळचे माजी संचालक मुरलीधर जाधव यांचा सर्वसाधारण गटातील उमेदवारी अर्ज अवैध ठरला. वार्षिक २४० दिवसांत ४० हजार लिटर दूध पुरवठ्याची अट लागू करण्यात आली आहे. जाधव यांनी १३१ दिवसांत ५८ हजार लिटर दूध पुरविल्याचे नोंदविण्यात आल्याने दिवसांची अट पूर्ण न झाल्याचा ठपका ठेवत जनरल गटातील अर्ज बाद करण्यात आला. मात्र, दुसऱ्या संस्थेमार्फत दाखल केलेला त्यांचा ओबीसी गटातील मुरलीधर जाधव यांचा तसेच त्यांच्या चिरंजीवांचा अर्ज वैध ठरला आहे. त्यामुळे जनरल गटातील अर्ज बाद झाल्यानंतरही ओबीसी प्रवर्गातून निवडणुकीच्या रिंगणात राहण्याचा त्यांचा मार्ग खुला झाला आहे.

युवराज गवळींचा एक अर्ज बाद, दुसरा वैध
आमदार सतेज पाटील गटाचे उमेदवार युवराज गवळी यांच्याही दोन संस्थांमार्फत दाखल अर्जांपैकी एक अर्ज छाननीत अवैध, तर दुसरा वैध ठरला. धोंडीराम दादू गवळी दूध संस्थेचा दूध पुरवठा कोटा अपूर्ण असल्याने या संस्थेमार्फत दाखल केलेला अर्ज बाद करण्यात आला. दरम्यान, नवनाथ सहकारी दूध संस्था, दर्याचे वडगाव या संस्थेचे गवळी संचालक आहेत. या संस्थेचा दूध व पशुखाद्य पुरवठ्याचा कोटा पूर्ण असल्याने या संस्थेमार्फत दाखल केलेला त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला. यासंदर्भातील आवश्यक लेखी माहिती व कागदपत्रे वकिलांमार्फत निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली आहेत.

Advertisement
Tags :

.