For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

गोकुळ अध्यक्षपद: जे नको होतं तेच झालं! सतेज पाटील निवडणूक जिंकूनही हरले, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार शासननियुक्त सदस्यांवर शिक्कामोर्तब

02:41 PM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोकुळ अध्यक्षपद  जे नको होतं तेच झालं   सतेज पाटील निवडणूक जिंकूनही हरले  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार शासननियुक्त सदस्यांवर शिक्कामोर्तब
Advertisement
मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षात आता नवा ट्विस्ट आला आहे. राज्य मंत्रिमंडळाने तीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांमध्ये मतदानाच्या अधिकारासह चार शासननियुक्त तज्ज्ञ संचालक नेमण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गोकुळच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 13 जागा जिंकल्या, तर महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला 12 जागांवर समाधान मानावे लागले. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेला 14 संचालकांचा कोरम पूर्ण होत नसल्याने निवड प्रक्रिया रखडली आहे.

शासननियुक्त संचालकांमुळे समीकरणे बदलणार?

मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार संबंधित सहकारी संस्थांवर चार शासननियुक्त तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती होणार असून, त्यांना मतदानाचा अधिकारही मिळणार आहे. गोकुळमध्ये या नियुक्त्या झाल्यास अध्यक्षपदाच्या निवडीत नव्या राजकीय समीकरणांना वाव मिळू शकतो. त्यामुळे या निर्णयाकडे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement

सतेज पाटील यांचा सरकारवर निशाणा

मंत्रिमंडळाच्या निर्णयावर सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी दिलेला जनादेश नाकारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या निर्णयाविरोधात सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करणार असल्याचे सांगत, गरज पडल्यास आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

बहुमत असूनही अध्यक्ष निवडीसाठी इतर संचालकांचा पाठिंबा मागण्यावरून महायुतीवर त्यांनी टीका केली. तसेच, सत्तेची समीकरणे कायमस्वरूपी नसतात आणि आगामी काळात त्यात बदल होऊ शकतात, असे सांगत त्यांनी राजकीय इशाराही दिला.

Advertisement

गोकुळच्या निवडणुकीत कोणाचे किती संचालक?

राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे 13 विजयी उमेदवार :

शशिकांत पाटील चुयेकर, बाबासाहेब श्रीपती चौगले, अभिजित प्रभाकर ताईशेटे, किसन बापू सो चौगले, राहुल बजरंग देसाई, बाबासाहेब विष्णू देवकर, विश्वजित दिनकरराव जाधव, विद्याधर बाबूराव गुरबे, अंजना केदारी रेडेकर, भाग्यश्री धीरज डोंगळे, शशिकांत शामराव खोत, राजुबाबा जयवंतराव आवळे आणि बयाजी देवू शेळके.

छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे 12 विजयी उमेदवार :

राजेश नरसिंगराव पाटील, राहुल पी. एन. पाटील, रणजित के. पी. पाटील, रणजित दिलीप पाटील, अंबरिशसिंह संजय घाटगे, चेतन अरुण नरके, अजित शशिकांत नरके, अजित पांडुरंग पाटील, वीरेंद्र संजय मंडलिक, युवराज दत्ताजीराव पाटील, मदन बाबूराव देसाई आणि अमर पाटील.

गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड आता शासननियुक्त संचालकांच्या निर्णयावर आणि पुढील राजकीय घडामोडींवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील हा संघर्ष आगामी काळात अधिक तीव्र होण्याचे संकेत आहेत.

Advertisement
Tags :

.