For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Gokul President Election : सत्ताधाऱ्यांमध्ये 2 तास खलबतं, नाव पाकिटात बंद, नवीन चेअरमनचे नाव आज जाहीर होणार

11:39 AM May 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
gokul president election   सत्ताधाऱ्यांमध्ये 2 तास खलबतं  नाव पाकिटात बंद  नवीन चेअरमनचे नाव आज जाहीर होणार
Advertisement

पण नाव कोणाचे निश्चित झाले याचा मात्र नेत्यांनी सस्पेन्स ठेवला.

Advertisement

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या नूतन चेअरमन पदाचे नाव पाकिटात बंद झाले आहे. चेअरमन निवडीबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेत गोकुळ सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांमध्ये दोन तास खलबते झाली. दीर्घकाळ चाललेल्या या चर्चेनंतर सर्वानुमते नाव निश्चित करण्यात आले. पण नाव कोणाचे निश्चित झाले याचा मात्र नेत्यांनी सस्पेन्स ठेवला.

चेअरमन निवडीबाबत आज शुक्रवार 30 रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील हे बंद पाकीट घेऊन येत नवीन चेअरमनचे नाव जाहीर करणार आहेत. आजच्या बैठकीमध्येच नूतन चेअरमनचे नाव कळणार असल्याने नूतन चेअरमन कोण याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Advertisement

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदाची निवड काही तासावर आली असताना अध्यक्षपदाच्या नावावरून नवा ट्विस्ट तयार झाला आहे. सर्व समावेशक चेहरा अध्यक्षपदी निवडला जाईल असे नेते मंडळींनी सांगितले असले तरी गुरुवारी पुन्हा एकदा नेतेमंडळी एकवटल्याने नवा अध्यक्ष कोण हा सस्पेन्स कायम राहिला.

गोकुळमधील सत्ताधारी आघाडीत असलेल्या महायुतीच्या नेतेमंडळीवर गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा झाला पाहिजे असा मुंबईवरून निरोप आल्याचे समजते. त्यामुळे गुरुवारी पुन्हा एकदा राजकीय घडामोडी वेगावल्या. संध्याकाळी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये गोकुळमधील सत्ताधारी नेते मंडळींची अडीच तास बैठक झाली. सायंकाळी पाच वाजता सुरू झालेली बैठक रात्री साडेसात वाजता संपली. नेत्यांच्या बैठकीनंतर संचालकासोबत बैठक झाली.

या बैठकीत नेत्यांनी, नवीन अध्यक्ष पदाबाबत सगळ्यांनी एक दिलाने निर्णय घेतला आहे. बंद पाकिटातून शुक्रवारी तो कळवला जाईल. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्याकडे पाकीट दिले जाईल असे सांगितले. बैठकीमध्ये आमदार विनय कोरे यांनी चेअरमन पदासाठी अमरसिंह पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला तर अंबरिष घाटगे यांच्या नावाबाबतही चर्चा झाल्याचे समजते.

गोकुळचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार संजय घाटगे, माजी आमदार के.पी. पाटील यांच्यामध्ये बैठक झाली. यानंतर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीला सत्ताधारी आघाडीचे सर्व संचालक उपस्थित होते.

हम सब एक है, शाहू शेतकरी पॅनेलचा चेअरमन यावेळी गोकुळचा नवा अध्यक्ष महाविकास आघाडीचा की महायुतीचा असा प्रश्न केल्यावर मंत्री हसन मश्रीफ यांनी हम सब एक है, असे उत्तर दिले. तर आमदार सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचा चेअरमन असेल असे उत्तर दिले. त्यामुळे गोकुळच्या नूतन चेअरमन पदावरुन ट्विस्ट निर्माण झाला आहे.

मुंबईच्या आदेशानंतर हालचाली गतिमानगोकुळच्या चेअरमनपदी सर्वमान्य चेहरा म्हणून शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. मात्र मुंबईवरुन महायुतीच्या वरीष्ठ नेत्यांचा चेअरमन निवडीबाबत आदेश आल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या. सत्ताधारी आघाडीचे सर्व नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाहूपुरी येथील प्रधान कार्यालयात एकत्र आले.

त्यांच्यामध्ये सुमारे दोन तासाहून अधिक काळ चर्चा झाली. मात्र नूतन चेअरमन कोण हे नेत्यांनी गुलदस्त्यात ठेवले. ऐतिहासिक कारभार, एकजूट कायम ठेवूया गोकुळच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत सध्याच्या संचालक मंडळाने विक्रमी कामगिरी केली आहे. वार्षिक नफा, दूध संकलन, विक्री अशा सर्वच पातळीवर उच्चांक गाठला आहे.

दूध उत्पादकांसह गोकुळशी निगडीत सर्वच घटकांना अपेक्षित असा कारभार संचालक मंडळाने केला आहे. हा कारभार असा पुढे सुरु ठेवत एकजुट कायम ठेवूया असे सर्वच नेत्यांनी बैठकीमध्ये बोलून दाखविले.

...म्हणजे माझ्या नावावर फुली

नेते व संचालक यांच्यामध्ये सुरु असलेल्या बैठकी दरम्यान नेत्यांनी नूतन चेअरमनचे नाव बंद पाकिटातून ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्याकडे दिले जाईल. ते बंद पाकीट घेऊन संचालक मंडळाच्या बैठकीत नूतन चेअरमनचे नाव घोषित करतील असे म्हणताच ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी म्हणजे माझ्या नावावर फुली अशी प्रतिक्रीया दिली. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

पहिला चेअरमन कोण यावरुनही वाद

गोकुळमध्ये सत्तांतर करण्यात ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांची भूमिका महत्त्वाची राहिली. त्यामुळे त्यांना प्रत्येकी दोन वर्ष चेअरमन पद देण्याचे ठरले. पहिला चेअरमन पद कोणाला द्यायचे यावरुनही त्यावेळी वाद निर्माण झाला होता. मात्र त्यावेळी सर्वांनी सामंजस्य दाखवले. तसेच सामंजस्य पुढील काळातही राहू दे असे आमदार विनय कोरे बैठकीमध्ये सांगितले.

मंत्री मुश्रीफ यांच्या चेहऱ्यावर तणाव

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ त्यांचे मत नेहमीच दिलखुलासपणे प्रसारमाध्यमांसमोर मांडतात. मात्र गोकुळच्या नूतन चेअरमन निवडीवरुन महायुतीच्या वरीष्ठ नेत्यांकडून त्यांच्यावर दबाव असल्याची चर्चा होती. हा दबाव त्यांच्या चेहऱ्यावरील तणावामधून जाणवत होता. नूतन चेअरमन निवडीबाबत प्रसार माध्यमांशी फार काही न बोलता मंत्री मुश्रीफ जिल्हा बँकेतून निघून गेले.

Advertisement
Tags :

.