Gokul President Election 2025: गोकुळच्या अध्यक्षपदी 'नविद मुश्रीफ' यांची निवड!
मंत्री मुश्रीफ यांनी वरीष्ठ नेत्यांची भेट घेतल्यानंतर डोंगळे यांचा राजीनामा झाला
By : धीरज बरगे
कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळच्या चेअरमन पदी गोकुळचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नविद मुश्रीफ यांची वर्णी लागली. गोकुळ शिरगांव येथील गोकुळच्या मुख्य प्रकल्पस्थळी आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये नविद मुश्रीफ यांचे सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. राजकुमार पाटील विभागीय उपनिबंधक पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन निवडीची बैठक झाली.
गोकुळच्या चेअरमन पदावरुन गेली वीस दिवस राजकीयनाट्या रंगले आहे. चेअरमन पदाचा कार्यकाळ संपत आल्यानंतर अरुण डोंगळे यांनी थेट मुंबई गाठत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी महायुतीच्या वरीष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार चेअरमनपदाचा राजीनामा न देण्याची भूमिका घेतली. मात्र मंत्री मुश्रीफ यांनी वरीष्ठ नेत्यांची भेट घेतल्यानंतर डोंगळे यांचा राजीनामा झाला.
यानंतर गोकुळ चेअरमन पदी सर्वमान्य चेहरा देणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. त्यानुसार गोकुळच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिलेले स्व. आनंदराव पाटील-चुयेकर यांचे सुपुत्र शशीकांत पाटील-चुयेकर यांचे नाव चर्चेत आले. मात्र चुयेकर हे आमदार सतेज पाटील गटाचे संचालक असल्याने त्यांच्या नावाला अंतर्गत विरोध झाला.
मुंबईवरुन वरीष्ठ नेत्यांचा आदेश आल्यानंतर गुरुवारी सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. सुमारे दोन तासाहून अधिककाळ ही बैठकीत चेअरमन पदाच्या नावावरुन नेत्यांमध्ये खलबते झाली. बैठकीमध्ये चेअरमन पदाचे नाव निश्चित झाले मात्र हे नाव नेत्यांनी गुलदस्त्यात ठेवले. त्यामुळे गोकुळचा नवा चेअरमन कोण याचा सस्पेन्स निर्माण झाला.
नूतन चेअरमनबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात असताना गुरुवारी रात्री उशिरा नविद मुश्रीफ यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. मात्र चेअरमन पदाची निवड होईपर्यंत नविद यांच्या नावाला अधिकृत दुजोरा मिळत नव्हता. गोकुळचे सत्ताधारी आघाडीचे सर्व संचालक दुपारी दोन वाजता गोकुळ शिरगांव येथील मुख्य प्रकल्पस्थळी आले.
ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्याकडून बंद लिफाफ्यातून नुतन चेअरमनचे नाव नेत्यांनी पाठविले. पार्टी मिटींगनंतर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ संचालक पाटील यांनी बंद लिफाफ्यातील नाव जाहीर केले. लिफाफ्यामध्ये नविद मुश्रीफ यांचे नाव होते. त्यांच्या नावाला सर्व संचालकांनी सहमती दर्शवली आणि सर्वानुमते नविद मुश्रीफ यांची गोकुळच्या चेअरमन पदी निवड झाली. निवडीनंतर मुश्रीफ गटाच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.