For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘गोकुळ’चा दूध विक्रीत विक्रमी उच्चांक ! रमजान ईदनिमित्त दिवसात 22 लाख 31 हजार लिटर दूध विक्री

07:01 PM Apr 11, 2024 IST | Abhijeet Khandekar
‘गोकुळ’चा दूध विक्रीत विक्रमी उच्चांक   रमजान ईदनिमित्त दिवसात 22 लाख 31 हजार लिटर दूध विक्री
Gokul milk Ramadan Eid
Advertisement

गतवर्षीच्या तुलनेत 1.62 लाख लिटरने विक्रीत वाढ

Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

गोकुळने रमजान ईदला दूध विक्रीचा विक्रमी उच्चांक गाठला. एका दिवसात तब्बल 22 लाख 31 लाख लिटर इतकी गोकुळ दूधाची विक्री झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या विक्रीत 1 लाख 62 हजार 592 लिटरने वाढ झाली. गोकुळने केलेल्या विक्रमी विक्रीबाबत कर्मचाऱ्यांच्यावतीने गुरुवारी अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष डोंगळे यांनी भविष्यात प्रतिदिन 20 लाख लिटर दूध विक्रीचे ध्येय, दूध उत्पादक व ग्राहकांच्या विश्वासाहर्ततेवर तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून साध्य करू असा विश्वास व्यक्त केला.

अध्यक्ष डोंगळे म्हणाले, गोकुळने दूध उत्पादक व ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्यक्रम दिला आहे. यामुळे गोकुळच्या दैनंदिन दूध संकलनात तसेच विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. रमजान ईद या दिवशी गोकुळच्या इतिहासातील एका दिवसाच्या दूध विक्रीचा नवीन उच्चांक प्रस्थापित झाला. रमजान ईद हा मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण. या दिवशी दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. यंदा 22 लाख 31 हजार 284 लिटर इतकी दूध विक्री एक दिवसात झाली. गतवर्षी रमजान ईदला 20 लाख 63 हजार 692 लिटर दूध विक्री झाली होती. यंदा त्यामध्ये 1 लाख 67 हजार 592 लिटरची वाढ झाली. तसेच गुढीपाडव्यानिमित्य श्रीखंड व बासुंदी विक्री मध्ये उच्चांकी वाढ झाली असल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले.

Advertisement

तसेच गोकुळने दूध विक्रीमध्ये नवीन मानदंड निर्माण केला असून गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवलेला आहे. या यशामध्ये गोकुळचे दूध उत्पादक, ग्राहक, वितरक, दुधसंस्था, कर्मचारी, अधिकारी व वाहतूक ठेकेदारांचे मोलाचे योगदान आहे. यामुळे ही सगळी मंडळी कौतुकास पात्र असल्याचेही अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले. प्रास्ताविक एम.पी.पाटील यांनी केले तर डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी यांनी आभार मानले. तसेच मार्केटिंग सहा.महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी संचालक बाळासो खाडे, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, संगणक व्यवस्थापक अरविंद जोशी, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळोखे, संकलन व्यवस्थापक एस. व्ही. तुरंबेकर, उपेंद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.