गोकुळचे माजी चेअरमन Arun Dongale राष्ट्रवादीत, मंत्री Hasan Mushrif यांची उपस्थिती
मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाला आणखी एक धक्का दिलाय
कोल्हापूर : गोकुळचे माजी चेअरमन संचालक अरुण डोंगळे यांनी मंगळवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ यांनी करवीर तालुक्यात माजी जि.प. अध्यक्ष राहूल पाटील यांच्यानंतर आता राधानगरी तालुक्यात गोकुळचे माजी चेअरमन डोंगळे यांचा पक्षप्रवेश घेत पक्ष बळकटी दिली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादीला बळकटी देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. जिल्ह्यात यापूर्वी दोन खासदार, पाच आमदार होते.
जिल्हा राष्ट्रवादीचा तसा बालेकिल्ला होता. मात्र कालांतराने जिल्ह्यात पक्षाला उतरती कळा लागली अन् दोन खासदार आणि पाच आमदारांची संख्या सध्या केवळ एका आमदारावर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पक्षाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी मंत्री मुश्रीफ प्रयत्नशील आहेत.
काही दिवसांपुर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे एकनिष्ठ आमदार स्व. पी. एन. पाटील यांचे सुपुत्र जि. प.चे माजी अध्यक्ष राहूल पाटील यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश झाला. राहूल पाटील यांचा हा प्रवेश काँग्रेससाठी धक्का होता. या पक्षप्रवेशानंतर आता गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांचा देखील पक्षप्रवेश घेत मंत्री मुश्रीफ यांनी एकप्रकारे शिवसेना शिंदे गटाला म्हणजेच पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना अप्रत्यक्षरित्या धक्का दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत राधानगरी मतदारसंघात आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारात डोंगळे अग्रभागी होते. त्यामुळे पालकमंत्री आबिटकर यांचे डोंगळे निकटवर्तीय बनले होते. शिवसेना शिंदे गटात डोंगळे प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र डोंगळेंचा एकदमच राष्ट्रवादीत पक्षप्रवेश घेत मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाला आणखी एक धक्का दिला आहे. गोकुळचे संचालक म्हणून गेली काम करताना डोंगळेंनी राधानगरीत चांगला संपर्क निर्माण केला आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादीला होणार आहे.