For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

Gokul Election Result LIVE: ‘तुमच्या पोराबाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का?’; मतपेटीत सापडलेल्या चिठ्ठीने निवडणुकीत रंगत

10:44 AM Oct 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
gokul election result live  ‘तुमच्या पोराबाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का ’  मतपेटीत सापडलेल्या चिठ्ठीने निवडणुकीत रंगत
Advertisement

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या बहुचर्चित निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान मतपेटीत आढळलेल्या एका चिठ्ठीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ‘तुमच्या पोराबाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का?’ असा सवाल या चिठ्ठीतून करण्यात आला आहे. निवडणुकीत मतदारांवर शपथा घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या मजकुराकडे लक्ष वेधले जात आहे.

Advertisement

शपथ घेण्याच्या आवाहनावरून मतदाराची नाराजी?

गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न झाल्याचे आरोप-प्रत्यारोप सुरू होते. काही नेत्यांनी धार्मिक श्रद्धा आणि शपथांचा आधार घेतल्याच्या चर्चाही निवडणूक काळात रंगल्या. याच पार्श्वभूमीवर मतपेटीत सापडलेल्या चिठ्ठीतील सवाल चर्चेचा विषय ठरला आहे.

Advertisement

गोकुळच्या सत्तेसाठी महायुती विरुद्ध सतेज पाटील

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची मतमोजणी १९ ऑक्टोबर रोजी होत असून, संघाची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या पाठिंब्याने मैदानात उतरलेली ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’ आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ यांच्यात प्रमुख लढत आहे.

संचालकपदाच्या २५ जागांसाठी ५० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानात ५,४१८ मतदारांपैकी ५,४०४ मतदारांनी मतदान केल्याची आकडेवारी देण्यात आली असून, मतदानाची टक्केवारी ९९.९६ इतकी नोंदवण्यात आली आहे.

शेवटच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोपांना धार

निवडणुकीच्या प्रचारापासूनच दोन्ही बाजूंमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. ठरावधारकांवर दबाव आणल्याचे आरोप, सहलींचे आयोजन आणि धार्मिक शपथांचा वापर केल्याच्या चर्चांमुळे निवडणुकीचे वातावरण तापले होते. महायुतीतील जागावाटपावरूनही मतभेद असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात होते.

महायुतीच्या नेत्यांकडून विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला, तर सतेज पाटील यांच्या आघाडीने मतदार आपल्याला पाठिंबा देतील, अशी भूमिका मांडली. या पार्श्वभूमीवर क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यताही चर्चेत आहे.

तालुकानिहाय मतदानाचा तपशील

उपलब्ध आकडेवारीनुसार, करवीर, कागल, गगनबावडा, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शिरोळ आणि हातकणंगलेसह अनेक तालुक्यांत मतदानाची टक्केवारी १०० टक्के नोंदवण्यात आली आहे. आजरा येथे ९९.६७ टक्के, तर गडहिंग्लज येथे ९९.७५ टक्के मतदान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आता मतमोजणीतून कोणत्या आघाडीला बहुमत मिळते, हे स्पष्ट होणार आहे. गोकुळच्या सत्तासंघर्षात मतपेटीत सापडलेल्या चिठ्ठीची चर्चा आणि निकालाचे राजकीय परिणाम याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.