Gokul Election Result LIVE: महायुतीचे १७ उमेदवार आघाडीवर; विनय कोरेंच्या बालेकिल्ल्यात सतेज पाटील यांच्या आघाडीची मुसंडी
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत चुरस कायम असून, सर्वसाधारण गटातील आतापर्यंत १,६५० मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. या फेरीत महायुतीचे २० पैकी १७ उमेदवार किरकोळ मतांच्या फरकाने आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. तर आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचे तीन उमेदवार आघाडीवर असल्याचे वृत्त आहे.
क्रॉस व्होटिंगची धास्ती कायम
मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीतही क्रॉस व्होटिंगची शक्यता दोन्ही आघाड्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. मतांमधील फरक कमी असल्याने निकालाच्या पुढील फेऱ्यांमध्ये चित्र बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या समर्थकांचे लक्ष मतमोजणीच्या प्रत्येक अपडेटकडे लागले आहे.
विनय कोरेंच्या बालेकिल्ल्यात सतेज पाटील यांच्या आघाडीची मुसंडी
आमदार विनय कोरे यांच्या प्रभावक्षेत्रात सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे वृत्त आहे. या घडामोडीमुळे गोकुळच्या सत्तासंघर्षातील चुरस आणखी वाढली आहे.
दरम्यान, मतमोजणीच्या पुढील फेऱ्यांमध्ये कोणते उमेदवार आघाडी टिकवतात आणि अंतिम निकाल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
