Gokul Milk Union Election | 'गोकुळ' निवडणुकीची प्रक्रिया सुरू
गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळ निवडणुकीची अधिकृत घोषणा
कोल्हापूर -कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) च्या आगामी निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतरित्या सुरू झाली आहे. मतदार यादी तयार करण्यासाठी प्रशासनाने हालचाली वेगात आणल्या आहेत. ८ मे २०२६ पर्यंत सभासद म्हणून पात्र असलेल्या सदस्यांची माहिती सॉफ्ट कॉपी स्वरूपात २ मार्च २०२६ पर्यंत कार्यालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक (दुग्ध), पुणे विभाग यांच्या कार्यालयाकडून आज संबंधित आदेश जारी करण्यात आला आहे. संचालक मंडळाची मुदत ४ मे २०२६ रोजी संपत असल्याने निवडणुकीसाठीची पूर्वतयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सहकारी संस्था अधिनियम १९६० व सहकारी संस्था (निवडणूक) नियम २०१४ च्या तरतुदीनुसार, पात्र सभासदांची अंतिम मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. संघ कार्यक्षेत्रातील संबंधित संस्थांनी वैध सभासदांची माहिती विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.