'गोकुळ' निवडणूक: छाननीत 'नो ऑब्जेक्शन'चा फॉर्म्युला, एकमेकांचे अर्ज सोडले वाऱ्यावर; 'तेरी भी चूप, मेरी भी चूप !' म्हणत छाननी केंद्रावर हास्याचे फवारे
इकबाल रेठरेकर
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत बाहेरून राजकीय आखाडा तापलेला असताना उमेदवारी अर्जाच्या छाननीच्या वेळी बहुउद्देशीय सभागृहात मात्र चक्क शांतता करार झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकमेकांच्या अर्जातील त्रुटी शोधून हरकतींचा मारा होईल, अशी अपेक्षा असताना बुधवारी झालेल्या छाननीत परस्परविरोधी गटांनी एकमेकांच्या अर्जावर हरकती घेण्याचे टाळले. त्यामुळे तेरी भी चूप, मेरी भी चूप ! म्हणत नो ऑब्जेक्शनचा फॉर्म्युला दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला.
गोकुळच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडी असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत दोन्ही बाजूंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्यानंतर छाननीच्या दिवशी आरोप-प्रत्यारोपांची आतषबाजी होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्षात चित्र काहीसे वेगळेच दिसले.
अर्जामधील त्रुटी, पात्रता, संस्थांचे ठराव, कागदपत्रे अशा मुद्द्यांवरून एकमेकांना घेरण्याऐवजी दोन्ही बाजूंनी 'आपला अर्ज पाहा, दुसऱ्याचा सोडा" अशीच भूमिका घेतल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, निवडणुकीपूर्वी 'एकही जागा सोडणार नाही", "पॅनेल तयार आहे", 'समोरच्यांना धडा शिकवू" अशा राजकीय डरकाळ्या फोडणाऱ्या गटांच्या समर्थकांमध्ये छाननी केंद्रावर मात्र चांगलेच स्नेहाचे वातावरण होते. कालपर्यंत व्यासपीठावरून एकमेकांवर शरसंधान साधणारे काही इच्छुक बुधवारी छाननी वेळी मात्र एकमेकांशी हसत-खेळत चर्चा करताना दिसले. त्यामुळे बाहेर राजकीय आखाडा, आत मात्र सलोखा ? असा सवाल उपस्थित झाला. निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या समोर छाननीची प्रक्रिया सुरू असताना विविध गटांचे उमेदवार आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र वातावरणात अपेक्षित तणावाऐवजी हास्यविनोद सुरू होते.
त्यामुळे हरकतींची तलवार म्यान का झाली? राजकीय संघर्ष फक्त प्रचारापुरताच आहे का? असे सवाल उपस्थित होत आहेत. संघर्षाची भाषा वाढत असली, तरी छाननीच्या दिवशी मात्र 'तुम्ही माझ्या अर्जाला हात लावू नका, मी तुमच्या अर्जाकडे पाहत नाही, असा अलिखित तह झाल्याचे चित्र दिसले. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीतील खरा सामना मतदानाच्या दिवशीच होणार की त्याआधीच सामंजस्याचे गणित आकाराला येणार, याकडे आता लक्ष लागले आहे.