कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Gokul Election 2025: मुंबईत गोकुळची आढावा बैठक, कारण एक 'राजकारण' अनेक

02:11 PM Jul 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सत्ताकारणात मुश्रीफ आणि पाटील हेच हुकमी एक्के असल्याचा संकेत

Advertisement

By : संतोष पाटील

Advertisement

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाची मुंबईत अनेकवेळा बैठका झाल्यात. मात्र, मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी झालेली बैठक ही राजकीय इशाऱ्यांना अप्रत्यक्ष उत्तर देणारी ठरली. बैठकीचे निमित्त मुंबई शहरातील दूध वितरण व्यवस्था सुरळीत करण्याचा होता. असे असले तरी गोकुळच्या सत्ताकारणात मुश्रीफ आणि पाटील हेच हुकमी एक्के असल्याचा संकेत अप्रत्यक्षपणे या बैठकीतून देण्यात आला आहे.

कोणतीही आणीबाणीची स्थिती नाही, अधिवेशनाची घाई नाही, की नेत्यांची धावपळ नाही, तरीही 21 पैकी 20 संचालक, बोर्ड मिटींगसह सर्वच वरिष्ठ अधिकऱ्यांच्या लवाजम्यासह कोल्हापुरातून मुंबईत जावून बैठक घेतली. बैठकीचे मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील या दोघांनीच नेतृत्व केले.

गोकुळमध्ये फक्त महाविकास आघाडीची सत्ता आहे म्हणणाऱ्यांना बैठकीच्या निमित्ताने डिवचले. काँग्रेसेचे नेते सतेज पाटील यांना गोकुळच्या राजकारणातून बेदखल केले आहे, गोकुळमध्ये आता महायुतीची सत्ता असल्याचे वातावरण चेअरमनपदी नविद मुश्रीफ यांच्या नियुक्तीनंतर तयार करण्याचा प्रयत्नही झाला.

गोकुळची निवडणूकही महायुती म्हणून लढवणार असून हसन मुश्रीफ त्यात असतील, असे संकेतही देण्यात आले आहेत. दरम्यान, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मागील आठवड्यात गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्ताने हसन मुश्रीफ यांची कळ काढली. गोकुळचा कारभार चांगला आहे तर टोकण का देता, असा सवाल केला.

यावर मुश्रीफ यांच्याकडून प्रतिक्रिया आली नाही. मात्र, सतेज पाटील यांनी गोकुळमध्ये पैशाचे राजकारण कोणी सुरू केले? असा प्रतिहल्ला महाडिक यांच्यावर चढवला. यातच गोकुळमध्ये चिरंजीव चेअरमन असल्याने एका घरात दोन पदे नकोत म्हणून जिल्हा बँकेच्या चेअरमनपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

यापार्श्वभूमीवर मुंबईत संचालक मंडळाची झालेली बैठक जिह्यातील राजकारणाचे बरेच अंतरंग सांगून जाणारी आहे. मुंबईतील वितरण व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न मावळते अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केला होता. पहिल्या दोन दिवसात लाखभर लिटर दूध शिल्लक राहिले. नेत्यांनीही कडक शब्दात कान टोचल्यानंतर पुन्हा पूर्वीप्रमाणेच वितरण व्यवस्था सुरू ठेवली गेली. मुंबईतील वितरण व्यवस्था, दूध पुरवठा वाढवणे, यासाठी मुंबईत संचालक मंडळाची बैठक घेतली.

हसन मुश्रीफ अॅक्शन मोडवर की सावध?

मुलगा गोकुळचा अध्यक्ष आहे म्हणून केडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सोडण्याचे हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले आहे. नविद मुश्रीफ यांना गोकुळचे अध्यक्ष करतानाच या गोष्टीचा विचार राजकारणात इतके पावसाळे काढलेल्या हसन मुश्रीफ यांनी केला नसेल का?

गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे पुढे आल्यानंतर सतेज पाटील यांनी गोकुळमध्ये आपण सत्ता आणली, निवडणूक वर्षात विरोधी आघाडीचा चेअरमन कसा करायचा असा सवाल उपस्थित केला. गोकुळची पुढील सत्ता आपल्या हातात ठेवायची असेल तर आत्ताच चेकमेट करावे लागेल, यातून आपल्यातीलच चेअरमन व्हावा म्हणून नविद यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. यासाठी सतेज पाटील यांना मुश्रीफ यांना पटवून दिलेलं मुद्दे महत्वाचे ठरले होते.

एका बाजूला सांगण्यापुरते महायुतीचा चेअरमन झाला असला तरी खऱ्या अर्थाने मुश्रीफ-पाटील पॅनेलचा तोही घरातील हक्काची चेअरमन करत दोघांनी बाजी मारली. आता गोकुळच्या चेअरमन पदावरुन मुश्रीफ केडीसीसी बँकेच्या चेअरमनपदाचा राजीनामा देऊ पहात आहेत. कागल आणि पर्यायाने जिल्हा बँकेतील राजकारणातील आपली ताकद आजमवण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग असू शकतो.

मुश्रीफ यांची मनधरणी करण्यासाठी स्पर्धा लागेल, यातून एकप्रकारे मुश्रीफ यांचेच पॉलिटीकल ब्रॅण्डींग होणार आहे. राजीनामा अस्त्राने मुश्रीफ अॅक्शन मोडवर आले की, सावध राजकीय डाव टाकत आहेत, हे जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेतच स्पष्ट होईल.

गोकुळसह सहकारात याराना कायम राहणार

गोकुळसंबंधी विषयावरच संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. तरी यातून हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यातील राजकीय याराना किमान गोकुळ आणि सहकारात कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेत नेत्यांनी दिले. गोकुळची बैठक वरवर कामकाजाचा आढावा वाटत असली तरी यातून गोकुळवर आजच्या घटकेला आमच्या दोघांचेच राज्य असल्याकडे अंगुलीनिर्देष करणारी ही बैठक ठरली.

Advertisement
Tags :
(Mumbai)#Gokul milk#hasan mushrif#satej patil#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaGokul Election 2025Mahayutinavid mushrif
Next Article