For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोकुळमध्ये जागावाटपाचा तिढा कायम; भाजप २५ जागांवर अर्ज दाखल करणार

02:01 PM Sep 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोकुळमध्ये जागावाटपाचा तिढा कायम  भाजप २५ जागांवर अर्ज दाखल करणार
Advertisement

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम असतानाच भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपकडून गोकुळच्या सर्वच्या सर्व २५ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेतला, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीमुळे महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेला पुन्हा वेग आला आहे. सोमवारी (ता.२१) शक्तिप्रदर्शन करत भाजपचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.

Advertisement

गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी झाली. बैठकीत तालुकानिहाय संघटनात्मक तयारीचा आढावा घेतानाच संभाव्य उमेदवार आणि निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. महायुतीच्या माध्यमातून एकत्रितपणे निवडणूक लढविण्याची भूमिका कायम असल्याचे सांगितले जात असले, तरी जागावाटपावर अद्याप एकमत झालेले नाही. त्यामुळे भाजपने सावध पवित्रा घेत सर्व २५ जागांवर अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे. बैठकीनंतर आमदार अमल महाडिक यांनी जागावाटपाबाबत भूमिका स्पष्ट केली. महायुती म्हणून आम्ही एकत्र जाण्यास तयार आहोत. मात्र, जागावाटपाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. याबाबत वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे सोमवारी दाखल होणारे २५ अर्ज हे अंतिम उमेदवारीचे चित्र स्पष्ट करणारे नसून, पुढील राजकीय चर्चामध्ये भाजपची 'बार्गेनिंग पॉवर वाढविण्याचा प्रयत्न मानला जात आहे.

बैठकीत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील भाजप पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करून गोकुळ निवडणुकीची तयारी जाणून घेतली. जागावाटपात भाजपला समाधानकारक बाटा न मिळाल्यास पक्ष स्वतंत्रपणे लढण्याच्या पर्यायावरही चर्चा सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित होईपर्यंत गोकुळमधील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. बैठकीला खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजी पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी आमदार प्रकाश आवाडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, माजी संचालक चेतन नरके, शौमिका महाडिक, अंबरीश घाटगे, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, पी. जी. शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

भाजप स्वबळाच्या तयारीत?
भाजपने २५ जागांवर अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याने 'स्वबळा ची शक्यता पुन्हा चर्चेत आली आहे. जागावाटपात समाधानकारक वाटा न मिळाल्यास भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची तयारी ठेवत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सोमवारी होणारे अर्ज दाखल करण्याचे शक्तिप्रदर्शन महायुतीतील पुढील जागावाटपाच्या चर्चेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

आमदार शिवाजी पाटील नाराज नाहीत
चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती. मात्र, आमदार अमल महाडिक यांनी ही चर्चा फेटाळून लावली. बैठकीत कोणतीही नाराजी अथवा बाद झाला नसल्याचे स्पष्ट करत, सर्व घटक पक्षांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.