Gokul Election 2025: गोकुळ सभेच्या व्यासपीठावर पाटील-महाडिक गट एकत्र दिसणार?
पाटील-महाडिक गटामध्ये दिसणारी विरोधाची धार कमी होण्याची शक्यता
By : धीरज बरगे
कोल्हापूर : गोकुळच्या 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यंदा पाटील-महाडिक गट सभेच्या व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता आहे. विद्यमान चेअरमन नविद मुश्रीफ हे सत्ताधारी आघाडीचे अन् महायुतीचेही चेअरमन असल्याने सभेमध्ये प्रतिवर्षी पाटील-महाडिक गटामध्ये दिसणारी विरोधाची धार कमी होण्याची शक्यता आहे.
संपर्क सभेमध्ये विरोधी संचालिका शौमिका महाडिक सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या 4 वर्षात सभासदांमध्ये उभा राहून सत्ताधाऱ्यांना विरोध करणाऱ्या महाडिक यंदाच्या सभेमध्ये व्यासपीठावर दिसणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
गोकुळमध्ये पुढील काळात कशा पद्धतीने राजय्कारण होईल हे माहित नाही, पण सद्यस्थितीत चेअरमन मुश्रीफ यांच्यानिमित्ताने पाटील-महाडिक गट एकत्र आल्याने प्रतिवर्षी वादळी, गोंधळात होणारी गोकुळची सभा यंदा शांततेत होण्याची शक्यता आहे.
गोकुळ जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. मात्र, गेल्या 10 वर्षात गोकुळचे राजकारण माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्या गटाभोवतीचे फिरत आहे. गोकुळमध्ये माजी आमदार महादेय्वराव महाडिक, स्व. आमदार पी. एन. पाटील, माजी अध्यक्ष अरुण नरके यांची सत्ता असताना आमदार सतेज पाटील गटाने सभासदांच्या विविध प्रश्नांवरुन प्रत्येकवर्षी गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आक्रमक भूमिका घेतली.
मागील निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या 35 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत गोकुळमध्ये एक हाती सत्ता मिळविली. सत्तांतरानंतर आमदार सतेज पाटील गट सत्तेत तर महाडिक गट विरोधकाच्या भूमिकेत गेला.
त्यामुळे गेल्या 4 वर्षात गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यामुळे सत्ता कोणाचीही असो गोकुळच्या वार्षिक सभेमध्ये पाटील-महाडिक गटामधील इर्षा अन् विरोधाची धार काय कमी झाली नाही. सभेमध्ये दोन्ही गट आक्रमक होत असल्याने प्रत्येकवर्षी सभा वादळी व गोंधळातच पूर्ण व्हायची. पण यंदाच्या सभेचे स्वरुप बदलेले अन् सभा शांततेत होईल, असे काहीचे आत्ताचे चित्र आहे.
नविद मुश्रीफ यांच्यामुळे दोन्ही गट एकत्र
गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर पहिली 2 वर्ष ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांना चेअरमन करण्यात आले. यानंतरची 2 वर्ष ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे हे संचालक झाले. तर शेवटच्या एका वर्षासाठी आमदार सतेज पाटील गटाचा चेअरमन होईल असा फॉर्म्युला ठरला होता.
त्यानुसार शेवटच्या वर्षासाठी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, बाबासो चौगुले, शशिकांत पाटील-चुयेकर यांची नावे चर्चेत होती. मात्र, चेअरमन निवडी दरम्यान घडलेल्या नाट्यामय राजकीय घडामोडीनंतर चेअरमन महायुतीचा असावा, या फॉर्म्युलामधून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांच्या गळ्यामध्ये चेअरमन पदाची माळ पडली.
त्यामुळे गोकुळमध्ये सध्या चेअरमन मुश्रीफ हे सत्ताधारी आघाडीचे अन् महायुतीचेही चेअरमन ठरले आहेत. त्यामुळे आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक या दोन्ही विरोधी गटाचे समर्थन चेअरमन मुश्रीफ यांना आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात कट्टर प्रतिस्पर्धी असणारा पाटील-महाडिक गट सद्यस्य्थितीत चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या निमित्ताने गोकुळमध्ये एकत्र दिसत आहे.
सर्वसाधारण सभा होणार शांततेत
गोकुळची सभा गेल्या 10 वर्षात नेहमीच वादळी अन् गोंधळाची ठरली आहे. पण यंदाच्या सभेमध्ये हे चित्र बदलले जाण्याची शक्यता आहे. नविद मुश्रीफ हे महाडिक-पाटील या दोन्ही गटासाठी चेअरमन आहेत. पाटील गट गोकुळच्या सत्तेत आहे तर विरोधी महाडिक गट यंदाच्या सभेमध्ये सामंजस्याच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोकुळच्या सर्वसाधारण सभेमध्ये महाडिक गटाची भूमिका काय असणार, सभा नेहमीप्रमाणे गोंधळात होणार की शांततेत होणार हे 9 रोजीच स्पष्ट होणार आहे.
संचालिका शौमिका महाडिक दिसणार व्यासपीठावर?
गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने सत्ताधारी आघाडीच्या संचालकांकडून जिल्ह्यात संपर्क सभा सुरु आहेत. यापूर्वी विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक स्वतंत्रपणे संपर्क सभा घेत होत्या. मात्र, यंदा त्यादेखिल सत्ताधारी आघाडीच्या संपर्क सभेत सहभागी झाल्या आहेत.
तसेच मागील 4 वर्षातील सभांना संचालिका महाडिक व्यासपीठावर गेल्या नाहीत. त्यांनी सभासदांमध्येच उभा राहून सत्ताधाऱ्यांना कारभाराबाबत विचारणा केली. मात्र, यंदा नविद मुश्रीफ हे दोन्ही सत्ताधारी अन् विरोधी आघाडीसाठीही चेअरमन आहेत. महाडिक गटाच्या अन्य तीन संचालकांनी पहिल्यापासूनच सत्ताधाऱ्यांसोबत जुळवून घेतले आहे.
त्यामुळे संचालिका महाडिक 9 रोजी होणाऱ्या सभेमध्ये नेहमीप्रमाणे सभासदांमध्ये उभ्या राहून विरोध करणार की नविद मुश्रीफ हे महायुतीचे चेअरमन असल्याने व्यासपीठावर बसणार? याकडे गोकुळच्या सभासदांचे लक्ष लागले आहे.
"वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही काही प्रश्नांची उत्तरे गोकुळकडे मागितली आहेत. या प्रश्नांची उत्तरे काय येतात हे पाहून सर्वसाधारण सभेतील माझी भूमिका लवकरच प्रसार माध्यमांसमोर जाहीर करणार आहे."
- शौमिका महाडिक, संचालिका, गोकुळ