Gokul Election 2026 गोकुळच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, ४२७ संस्था अपात्र...निवडणूकीच्या तोंडावर राजकिय गणितं बदलणार
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या राजकारणाला आता नवे वळण मिळाले आहे. संघाच्या ४२७ संस्था अपात्र ठरल्या असून त्याचा फटका येत्या निवडणूकीत दिग्गजांना बसण्यासाठी शक्यता व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्याची महत्वाची सहकारी संस्था समजल्या जाणाऱ्या गोकुळच्या राजकारणात अशी ट्विस्ट आल्याने आता अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
गोकुळमधील कथित गैरव्यवहाराच्या आरोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळवर पहिल्यांदाच प्रशासक नियुक्ती केली होती. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी दूध संघात वाढवण्यात आलेल्या संस्थांच्या पात्रतेबाबतची चौकशी करण्यासाठी कृष्णा ठाकरे यांची नियुक्ती केली होती. त्याबाबत आज सुनावणी सुरु होती. या सुनावणीदरम्यान दूध निबंधकांनी ४२७ संस्थांना अपात्र जाहीर केले.
सत्ताधारी गटाला धक्का
४२७ संस्था अपात्र ठरणे हा राजकिय गणितं बदलणारा निर्णय असून याचा फटका सत्ताधारी गटाला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गोकुळकडे ५४२७ पैकी १३०८ संस्थाही अशाच पद्धतीने अपात्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील सर्वात मोठ्या गोकुळ दूध संघावर प्रथमच प्रशासक नियुक्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या काही काळापासून गोकुळच्या तापलेल्या राजकारणाला आता या निमित्ताने वेगळे वळण मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाच अधिकाऱ्यांचे प्राधिकृत अधिकारी मंडळ यापुढे संघाचे कामकाज पाहणार आहे.
प्रशासकाची नियुक्ती आणि घडामोडी
गोकुळवर नेमलेल्या प्रशासकांमध्ये साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक अध्यक्ष असलेल्या प्राधिकृत अधिकारी मंडळांमध्ये चंदगडचे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे, मुळशी येथील सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे, पणन विभागाचे लेखापरीक्षक सागर बलकवडे व कोल्हापूर जिल्हाधिकारी धर्मादाय रुग्णालय कक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत परळकर अशा पाच जणांचा समावेश आहे.
हा निर्णय भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील, प्रकाश बेलवाडे यांना दिलासा देणारा तर वैद्यकीय शिक्षण मंत्री गोकुळचे नेते यांना धक्का मानला जात आहे. गोकुळ दूध संघाची संचालक मंडळाची मुदत आज ४ मे रोजी संपुष्टात आली.
सहकार कायद्यातील नव्या तरतुदीनुसार संचालक मंडळाची पदे पुढे सुरू राहू शकत नसल्याने तसेच व्यवस्थापक मंडळांमधील पोकळी दूर करण्यासाठी उपरोक्त पाच जणांचे प्राधिकृत अधिकारी मंडळ नियुक्त करीत असल्याचे पत्र आज पुणे दुग्ध विभागाचे निबंधक राजकुमार पाटील यांनी दिले आहे. दरम्यान चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील आणि प्रकाश बेलवाडे यांनी गोकुळच्या अनेक अपात्र संस्था उघडकीस येणार असल्याचे विधान केले होते. त्यावर संघाचे अध्यक्ष नावीद मुश्रीफ यांनी ही अफवा असल्याचे म्हटले होते.