Gokul Election 2025 : अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास थेट नकार, नेमकं काय म्हणाले अरुण डोंगळे?
गोकुळमध्ये आजपर्यंत वरिष्ठ नेत्यांचा अदृश्य सहभाग होता
कोल्हापूर : सध्या कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष गोकुळ संस्थेकडे लागले आहे. कारण येत्या काही महिन्यात गोकुळच्या निवडणूका लागणार आहेत. गोकुळच्या निवडणुकीवरून कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय स्थितीचा अंदाज लावला जातो. कारण गोकुळ ही कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक धमणी आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता आणखी एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. गोकुळचे सध्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास थेट नकार दिला आहे. गोकुळमध्ये आज होणाऱ्या संचालक मंडळ बैठकीत देखील अरुण डोंगळे सहभागी होणार नाहीत, त्यामुळे आता हे राजकारण कोणते नवे वळण घेणार पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
याबाबत अरुण डोंगळे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. ते म्हणाले, गोकुळमध्ये आजपर्यंत वरिष्ठ नेत्यांचा अदृश्य सहभाग होता. आता तो उघडपणे आहे. आजच्या संचालक मंडळ बैठकीत सहभागी होणार नाही. वैयक्तिक कारणासाठी बैठकीला रजा कळवली आहे. आजच्या बैठकीत अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला जाणार होता. मात्र अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसारच राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुढे डोंगळे म्हणाले, गोकुळसह जिल्ह्यात महायुतीची सत्ता आहे. खासदार, आमदार महायुतीचेच असल्याने त्यांची ताकद अधिक आहे. माझ्या अध्यक्षपदासाठी कोणाचाही आग्रह नाही, मात्र गोकुळचा नवा अध्यक्ष महायुतीचाच असावा अशी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. त्यामुळेच आज राजीनामा देऊ नका, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. गोकुळमध्ये महाविकास आघाडीचा चेअरमन नको, यावर मतभेद आहेत.
आजच्या संचालक मंडळ बैठकीत अविश्वास ठराव आणल्यास, त्याबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते बघून घेतील. कारण राजीनामा न देण्याच्या सूचना त्यांनीच दिल्या आहेत. राज्य सरकारच्या मदतीशिवाय गोकुळसारख्या मोठ्या संस्थेमध्ये काही करता येत नाही. सरकारच्या विरोधात गेल्यास गोकुळला अडचणी येऊ शकतात. म्हणूनच महायुतीच्या नेत्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणार आहे, अशी स्पष्ट भूमिका गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी घेतली आहे.