Gokul Election 2025: केरळ दौऱ्यावर झाडी पहायची का?, गोकुळचे संचालक गोवा दौऱ्यावर
त्यांचा दिल्ली दौराही सोबत असलेल्या राजपुत्रामुळे गाजला होता
By : संतोष पाटील
कोल्हापूर : दूध उत्पादकांच्या हितासाठी गोकुळ संचालकांनी आणखी काय काय करायचे? मागील सहा महिन्यात संचालकांनी तीन वेळा देश आणि विदेशात अभ्यास दौरा केला. यातील काही दौरे हे खिशातील पैशातूनही केले. असाच त्यांचा दिल्ली दौराही सोबत असलेल्या राजपुत्रामुळे गाजला होता.
यावेळी केरळ दौऱ्यावर जायचे तर तिथे झाडी पहायची काय? असा सवाल उपस्थित झाल्याने गोवा येथे सहकुटुंब दौरा करण्यास सर्वानुमते पसंदी देण्यात आली. पुन्हा संधी मिळेल न मिळेल म्हणूनच निवडणुका जवळ येतील तसे यापुढेही अशाच पध्दतीने दौऱ्यासह इतर मार्गाने दूध उत्पादकांचे हित सांभाळले जाणार आहे.
गोकुळ संचालकांचे हे योगदान पाहून बस कर पगले, हमारे लिए कितना करोगो... अब रुलाओगो क्या...! असे म्हणण्याची वेळ दूध उत्पादकांवर आली आहे. कधीकाळी कोल्हापुरात आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक पद मिळावे, असे मिश्किलपणे म्हटले जायचे. यामागे संचालकांचा रुबाबही पंचवटीत नजरेत भरणारा होता.
चार वर्षापूर्वी गोकुळमध्ये सत्तांतर झाले. आता बस्स झाले म्हणत, मागील सर्व गैरप्रकार बंद, असे संकेत नेत्यांनी दिले. यातूनच गोकुळ संचालकांकडे असणाऱ्या स्कॉर्पिओ गाड्या काढून घेण्यात आल्या. काही कारभारी संचालकांच्या दूध टँकरचा थेट पास बंद झाला, काही ठेकेदारही बदलले, गोकुळच्या चिरेबंदी राजकारणाला आता पारदर्शीपणा आल्याचे भासमान चित्र निर्माण झाले.
गोकुळमध्ये चार विरोधी संचालक निवडून आल्याने वेळोवेळी तात्विक मुद्दयावर आतील प्रकार बाहेर येऊन गैर काही घडलेच तर चापही बसेल, अशी आशा दूध उत्पादकाला होती. मात्र शौमिका महाडिक वगळता उर्वरित तीन विरोधी आघाडीचे संचालक कधी सत्ताधारी झाले दूध उत्पादकाला पण समजले नाही.
गोकुळमधील सत्ता म्हणजे जिह्याची आर्थिक धमनी हातात असल्याचे मानले जाते. राज्यातील सत्तांतराचा फिकीर कधी गोकुळच्या कारभाऱ्यांना करावी लागली नाही. यावेळी मात्र राज्यकर्त्यांनी गोकुळच्या सत्तेमध्ये लक्ष घातल्याचे चित्र निर्माण झाले असले तरी निवडणूक होईपर्यंत सगळेच इथे सत्ताधारी असल्याचे वास्तव आहे.
त्यामुळे जो निर्णय होईल, त्याला वैचारिक विरोध होईल, दूध उत्पादकांच्या हितासाठी कोणी आवाज उठवेल? ही कालप्रमाणे आजही दूध उत्पादकाची भाबडी आशाच आहे. इथे येणार नवा चेअरमन गोकुळच्या उन्नतीसाठीच काम करणार असल्याचे सांगत असले तरी पायउतार होताना गोकुळचा किती विकास झाला याचे सिंहावलोकन करण्याचे धाडस कोणीच केले नसल्याची खंत दूध उत्पादकांची आहे.
आपली कारकिर्द विनासायास पार पडावी, पाच वर्षातील चार वर्ष गेली आता निवडणूक वर्षात धूसफूस नके असाच विचार नेत्यांसह कारभारी करत आहेत. यातून मागील सहा महिन्यात तीन-तीन वेळा गोकुळच्या संचालकांनी अभ्यास दौरा केला. हा अभ्यासदौरा निव्वळ दूध उत्पादकांच्या हितासाठीच असल्याचे सांगितले जाते. यातील थायलंडचा दौरा हा वैयक्तिक खर्चातून केल्याचे म्हणणे आहे.
वैयक्तिक खर्च असला तरी गोकुळमध्ये गेल्यापासून संचालकांच्या देहबोलीत झालेला बदल दूध उत्पादक टिपत आहेत. बिहारनंतर आता गोकुळचे संचालक सहकुटुंब गोवा दौऱ्यावर गेले आहेत. गोव्यात चार दिवस मनशांती शिबिर असेल. गोव्याला जाण्यापूर्वी कुठे अभ्यास दौरा करायची याबाबत चर्चा झाली होती म्हणे, केरळला जायचे ठरले, पण केरळला जाऊन काय झाडे पहायची काय ? असा सूर आल्यावर सर्वानुमते गोवा डेस्टीनेशन ठरले.
गोव्याला 21 पैकी 20 संचालक आणि त्यांचे कुटुंबिय, काही अधिकारी आणि कुटंब असे मिळून तब्बल 50 जणांना कुटुंब कबिला गोव्याला गेल्याची माहिती आहे. दूध उत्पादकांच्या हितासाठी गोकुळ संचालक करत असलेला अभ्यास दौरा मात्र कौतुकाचा विषय ठरला नाही तर नवलच...!
दूध उत्पादकांचे लक्ष आहे, लक्षात असू दे...!
मागील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत लक्ष्मीचे दर्शन तर दोन्ही बाजूंनी दाखवले होते. संघात सत्ताबदल हा कोणालातरी निवडून आणण्यासाठी नाही, तर कोणातरी घरी बसवण्याच्या निमित्तानेच झाला, हे सोळा आणे सत्य आहे. मागील सत्ताधाऱ्यांकडे गोकुळची सुत्रे आल्यानंतर कपड्यापासून वाहनांपर्यत झालेला बदल टिपत मतदारांनी हक्क बजावल्यानेच परिवर्तनाची लाट आली होती.
गोकुळच्या नव्या सत्ताधाऱ्यांच्या कारभाराकडे संपूर्ण जिह्याचे बारीक लक्ष आहे. याची जाणीव 18 लाख लिटर दूध संकलन असलेल्या गोकुळची स्पर्धा काही लाख लिटर दूध संकलन असलेल्या अमुल सोबत कऊ पाहणारे वारसदार आणि नेत्यांसह संचालक मंडळाला नसेल असे मानने म्हणजे ‘दूध’ खुळेपणाने ठरेल.