For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

गोकुळचे संचालक मंडळ 25 वरून 33 होणार? मंत्री चंद्रकांत पाटलांची सहकार कायद्यात बदलाची मागणी

12:44 PM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोकुळचे संचालक मंडळ 25 वरून 33 होणार  मंत्री चंद्रकांत पाटलांची सहकार कायद्यात बदलाची मागणी
Advertisement
कोल्हापूर : तीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाची संख्या वाढविण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करण्याची मागणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. प्रस्तावित बदलानुसार शासन नियुक्त आणि संस्था नियुक्त संचालकांची संख्या प्रत्येकी दोनवरून चार करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रस्तावाचा थेट परिणाम चार हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या गोकुळ दूध संघावर होणार असून, संचालक मंडळाची संख्या 25 वरून 33 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

गोकुळच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच चंद्रकांत पाटील यांनी सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाच्या रचनेत बदल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सुमारे 15 दिवसांपूर्वी पत्र दिले आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रासह गोकुळच्या राजकीय वर्तुळात या प्रस्तावाची चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement

संचालकांची संख्या दुप्पट करण्याची मागणी

चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात तीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करण्याची मागणी केली आहे. सध्याच्या कायद्यानुसार सहकारी संस्थांच्या संचालक मंडळावर शासनाकडून दोन आणि संस्थेकडून दोन नामनिर्देशित संचालक असतात. ही संख्या प्रत्येकी चार करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.

Advertisement

मोठ्या सहकारी संस्थांकडे सार्वजनिक निधी, पत आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे अशा संस्थांच्या कामकाजात पारदर्शकता, व्यावसायिक कौशल्य आणि प्रभावी प्रशासकीय नियंत्रण असणे आवश्यक आहे. प्रस्तावित बदलामुळे संस्थांना अधिक तज्ज्ञ संचालकांचे मार्गदर्शन मिळेल आणि लोकशाही प्रतिनिधित्व अधिक व्यापक होईल, असे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.

गोकुळमध्ये आठ संचालकांची भर पडण्याची शक्यता

गोकुळ दूध संघाची वार्षिक उलाढाल तीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याने प्रस्तावित कायद्यातील बदलाचा परिणाम त्याच्या संचालक मंडळावर होण्याची शक्यता आहे. सध्याच्या 25 संचालकांच्या मंडळात शासन नियुक्त आणि संस्था नियुक्त संचालकांची संख्या वाढल्यास एकूण संचालकांची संख्या 33 वर जाण्याची शक्यता आहे.

या बदलामुळे गोकुळच्या सत्तासमीकरणावर काय परिणाम होणार, शासन नियुक्त संचालकांची भूमिका काय असेल आणि नव्या संचालकांना मतदानाचा अधिकार मिळणार का, याबाबत सहकार क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव आणण्याची मागणी

सहकार कायद्यातील प्रस्तावित दुरुस्ती येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळणार का, त्यानंतर कायद्यात प्रत्यक्ष सुधारणा होणार का आणि गोकुळच्या संचालक मंडळाची रचना बदलणार का, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.