गाय दूध उत्पादकांना मिळणार 13 कोटी; प्रतिलिटर 5 रुपये अनुदान : दूध उत्पादकांना दिलासा
मात्र अटी, शर्थीची पूर्तता करताना होणार दमछाक; जिल्ह्यात प्रतिदिन 8 लाख 72 हजार लिटर दूध संकलन; शासनाच्या अनुदानामुळे गाय दूध उत्पादकांना दिलासा
धीरज बरगे कोल्हापूर
राज्य सरकारकडून गाय दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या प्रतिलिटर पाच रुपये अनुदानातून जिल्ह्यातील दूध उत्पादकांना महिन्याकाठी सुमारे 13 कोटी रुपये मिळणार आहेत. दूध संघांनी खरेदी दरात केलेल्या कपातीमुळे संकटात सापडलेल्या उत्पादकांना या अनुदानामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र यासाठी शासनाने घालून दिलेल्या अटी, शर्थींची पूर्तता करताना दूध संघांसह उत्पादकांची दमछाक होणार आहे. जिल्ह्यात सहकारी आणि खासगी अशा एकूण 13 दूध संघांच्या माध्यमातून दिवसाकाठी सुमारे 8 लाख 72 हजार 250 लिटर गाय दूध संकलन होते. 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत संकलित होणाऱ्या गाय दूधासाठी ही योजना असणार आहे.
गाय दूध खरेदी दरात राज्यातील सहकारी, खासगी दूध संघांनी कपात केल्यामुळे गाय दूध उत्पादक रस्त्यावर उतरले. राज्यातील अनेक भागात दूध खरेदी दरात वाढीसाठी आंदोलने झाली. गाय दूध खरेदी दराचा प्रश्न हिवाळी अधिवेशनातही उपस्थित झाला. यावर सरकारने गांभीर्याने विचार करत अपर मुख्य सचिव (वित्त) व सचिव (पदु) यांची उपसमिती नेमली. या समितीने तीन पर्याय सुचवाले. यामधून सरकारने गाय दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार गाय दूधाला 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ या गुणप्रतिकरीता किमान 27 रुपये प्रतिलिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्याच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन जमा करणे बंधनकारक राहणार आहे.
त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत पाच रुपये अनुदान प्रतिलिटर बँक खात्यावर थेट वर्ग केले जाणार आहेत. फॅट व एसएनएफ 3.5 व 8.5 या गुणप्रतिपेक्षा प्रति पांईट कमी होणाऱ्या फॅट व एसएनएफकरीता प्रत्येकी 30 पैसे वजावट करता येईल. तसेच प्रति पांईट वाढीकरीता 30 पैसे वाढ देण्यात येणार आहे.
राज्यात प्रतिदिन 149 लाख लिटर दूध संकलन
नोव्हेंबर 2023 च्या आकडेवारीनुसार राज्यात प्रतिदिन 149 लाख लिटर गाय दूध संकलन होते. प्रस्तावित 5 रुपये अनुदानाप्रमाणे राज्यातील गाय दूध उत्पादकांना सरकारला महिन्याकाठी 230 कोटी रुपये इतके अनुदान द्यावे लागणार आहे.
जिल्ह्यात गोकुळ, वारणाचे सर्वाधिक संकलन
जिल्ह्यात दिवसाकाठी सुमारे 8 लाख 72 हजार लिटरहून अधिक गाय दूधाचे संकलन होते. यामध्ये गोकुळ व वारणा दूध संघाकडून सर्वाधिक दूध संकलित केले जाते. गोकुळकडून प्रतिदिन 5 लाख 73 हजार 098 इतके तर वारणा दूध संघाकडून प्रतिदिन 2 लाख 46 हजार 569 लिटर दूध संकलन केले जाते.
योजनेसाठीच्या नियम व अटी अशा :
-योजनेत सहभागी होण्यासाठी दूध संघांनी आयुक्त दुग्धव्यवसाय विकास यांच्याकडे अर्ज करणे बंधनकारक राहील.
-अनुदानासाठी दूध उत्पादकांचे बँक खाते त्यांच्या आधारकार्डशी व पशुधनाच्या आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक असेल. त्याची पडताळणी संबंधित जिल्हा दुग्धविकास अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या
समितीमार्फत करण्यात येईल.
-योजनेत सहभागी दूध संघांनी दूध खरेदीबाबतची दैनंदिन माहिती रोज अद्ययावत ठेवणे व संबंधित जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक राहील, त्याची प्रत आयुक्त दुग्धविकास यांना सादर करावी लागणार आहे. योजनेमध्ये दूध संघांकडून अनियमितता आढळल्यास संबंधित संघावर कायदेशीर कारवाई करून, अनुदानाची रक्कम व्याजासह वसूल करण्यात येईल.
-परराज्यातून संकलित दुधास ही योजना लागू होणार नाही.
-योजनेत सहभागी शेतकऱ्यांकडील दुधाळ जनावरांची नोंदणी भारत पशुधन पोर्टलवर असणे बंधनकारक असणार आहे.
-शेतकऱ्यांचे आधार लिंक बैंक खात्याची पशुधनाची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी करावी.
जिल्ह्यातील सहकारी व खासगी दूध संघांकडून प्रतिदिन संकलित केल्या जाणाऱ्या गाय दुधाची आकडेवारी अशी :
दूध संघ संकलित दूध (लिटरमध्ये)
गोकुळ 5,73,098
वारणा 2,46,569
दत्त इंडिया (डिलिशिया) 6000
मेहता डेअरी 9,600
स्वाभिमानी 16,420
छत्रपती शाहू 780
वैजनाथ शिनोळी 3006
जोतिर्लिंग वाडीचरण 3,200
अन्नपूर्णा व्हनाळी 4,200
हरे कृष्ण शिनोळी 230
समाधान (थोरातांचे वडगांव) 2000
शिरोळ तालुका 2974
हनुमान यळगुड 150
एकूण 8,72,250