गोकुळ अध्यक्ष निवडीत 'कोरम' डाव, १२ संचालक गैरहजर राहण्याची शक्यता; दिवाळीनंतर निवड होण्याचे संकेत
कोल्हापूर: आमदार सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी रणनीती आखल्याची माहिती समोर येत आहे. गोव्यात झालेल्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत अध्यक्ष निवडीच्या सभेला संचालक अनुपस्थित ठेवून कोरमचा पेच निर्माण करण्याबाबत निर्णय झाल्याचे समजते. त्यामुळे गुरुवारी (दि. २९) होणारी अध्यक्ष निवड लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेला कोरम पूर्ण होऊ नये, यासाठी महायुतीचे १२ संचालक सभेला गैरहजर राहणार असल्याची चर्चा आहे. यामुळे सभा तहकूब होऊन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया दिवाळीनंतर होण्याची चिन्हे आहेत. कोणत्याही परिस्थितीत गोकुळची सत्ता सतेज पाटील यांच्या आघाडीकडे जाऊ द्यायची नाही, अशी भूमिका महायुतीतीलच एका बड्या नेत्याने बैठकीत मांडल्याची माहिती आहे.
दरम्यान, गोकुळवर आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी चार शासननियुक्त संचालक नेमण्याच्या पर्यायावरही चर्चा झाल्याचे समजते. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या नियुक्त्यांना मंजुरी मिळवून घेण्याचे नियोजन असल्याची माहिती आहे. या नियुक्त्यांमुळे अध्यक्ष निवडीच्या राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बुधवारी दिवसभर अध्यक्ष निवडीच्या सभेला महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की अनुपस्थित राहणार, यावर राजकीय खलबते सुरू होती. गोव्याच्या सहलीवर असलेल्या संचालकांना सभेपासून दूर ठेवण्याचा निर्णय झाल्याचे समजते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपस्थित राहण्याचा आदेश आल्यास संचालकांना तातडीने कोल्हापुरात आणण्यासाठी विशेष विमानाचीही करण्यात आल्याची व्यवस्था करण्यात चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भूमिका आणि महायुतीच्या अंतिम निर्णयाकडेही लक्ष लागले आहे.
शासननियुक्त संचालकांची भूमिका महत्त्वाची
सहकारी संस्थांच्या संचालक मंडळावर शासननियुक्त प्रतिनिधींच्या समावेशाचा मुद्दा अनेकदा राजकीय चर्चेचा विषय ठरतो. अशा नियुक्त्यांमुळे संचालक मंडळातील संख्याबळ, निर्णयप्रक्रिया आणि सत्तासमीकरणांवर परिणाम होऊ शकतो. मात्र, नियुक्त्यांची वैधानिक तरतूद, अधिकार आणि मतदानातील भूमिका यांचा विचार करूनच त्यांचा प्रत्यक्ष परिणाम निश्चित होणार आहे.
गोकुळच्या दृष्टीने निर्णय अडचणीचा
गोकुळ दूध संघ हा कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा आर्थिक आणि राजकीय केंद्रबिंदू आहे. दूध उत्पादक संस्था, लाखो दूध उत्पादकांचे हित, दूध संकलन-वितरणाचे जाळे आणि हजारो कोटींची उलाढाल यामुळे संघावरील नियंत्रणाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची निवड केवळ राजकीय लढाई न राहता संघाचे हिताला प्राधान्य देण्याची गरज असल्याची भूमिकाही काही नेत्यांनी बैठकीत मांडल्याचे समजते. त्यामुळे महायुतीच्या संचालकांना अनुपस्थित ठेवण्यावरून महायुतीमधील नेत्यांच्यामध्ये दोन मत प्रवाह असल्याची चर्चा आहे.
'समविचारी'चे संचालक कोल्हापुरात
सहलीवर गेलेले समविचारी आघाडीचे १३ संचालक बुधवारी सायंकाळी कोल्हापुरात परतले. शहरातील एका हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असून तेथूनच समविचारी आघाडीचे संचालक सभेसाठी रवाना होणार आहेत.
