गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी 10 नोव्हेंबरला पुन्हा सभा; कोल्हापूर सर्किट बेंचचे आदेश; 25 संचालकांना नोटीस बजावण्याचे निर्देश, 11 नोव्हेंबरला पुन्हा सुनावणी
अध्यक्ष निवडीचा चेंडू पुन्हा एकदा संचालकांच्या कोर्टात गेला असला, तरी महायुतीचे 12 संचालक सभेला उपस्थित राहणार का, हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे 10 नोव्हेंबरच्या सभेत अध्यक्ष निवडीचा तिढा सुटणार की पुन्हा राजकीय पेच निर्माण होणार, याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.
महायुतीच्या अनुपस्थितीने निर्माण झाला पेच
गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी 29 ऑक्टोबर रोजी बोलावण्यात आलेल्या सभेत महायुतीचे 12 संचालक अनुपस्थित राहिल्याने आवश्यक कोरम पूर्ण होऊ शकला नव्हता. परिणामी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सभा तहकूब केली. त्यानंतर आमदार सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू समविचारी आघाडीच्या 13 संचालकांनी स्वतंत्र बैठक घेऊन शशिकांत पाटील-चुपेकर यांची अध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले. या निवडीला वैधतेची मान्यता मिळावी, यासाठी समविचारी आघाडीने न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर यापूर्वी झालेल्या सुनावणीत अनुपस्थित संचालकांना पक्षकार करून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. सोमवारी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुमारे तीन तास सुनावणी झाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपापली बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने अध्यक्ष निवडीची प्रक्रिया नियमानुसार पुन्हा पार पाडण्याचा मार्ग मोकळा केला.
महायुतीच्या भूमिकेकडे लक्ष
न्यायालयाने सर्व 25 संचालकांना सभेची नोटीस बजावण्याचे निर्देश दिले असले, तरी महायुतीच्या संचालकांना सभेला उपस्थित राहण्याचे बंधनकारक आदेश दिलेले नाहीत, अशी माहिती महायुतीचे वकील अॅड. अनिल साखरे यांनी दिली. त्यामुळे नोटीस मिळाल्यानंतर महायुतीचे संचालक कोणती भूमिका घेतात, याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समविचारी आघाडीचे वकील अॅड. श्रीकृष्ण गणबावले यांनीही न्यायालयाच्या आदेशानुसार 10 नोव्हेंबर रोजी अध्यक्ष निवडीची सभा होणार असून, त्यानंतर 11 नोव्हेंबरला पुन्हा सुनावणी होईल, असे स्पष्ट केले.
शासन नियुक्त संचालकांचा सहभाग नाही
गोकुळच्या अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत शासन नियुक्त संचालकांच्या सहभागाचा मुद्दाही चर्चेत आला आहे. शासनाकडून चार संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार दिल्यास अध्यक्ष निवडीचे गणित बदलू शकते. मात्र, न्यायालयाने सध्या गोकुळच्या 25 संचालकांनाच नोटीस बजावण्याचे निर्देश दिले असल्याने आगामी सभेत या संचालकांचाच सहभाग राहणार आहे.
10 नोव्हेंबरची सभा ही केवळ अध्यक्ष निवडीची प्रक्रिया नसून दोन्ही आघाड्यांच्या राजकीय भूमिकेची कसोटी ठरणार आहे. त्यामुळे गोकुळमधील सत्तासंघर्षाला या सभेत निर्णायक वळण मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
