For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

'गोकुळ'चा अध्यक्ष आज ठरणार; महायुतीच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

08:47 AM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
 गोकुळ चा अध्यक्ष आज ठरणार  महायुतीच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
Advertisement

कोल्हापूर: गोकुळ अध्यक्षपदाची निवड आज गुरुवारी (दि. २९) होणार असून, या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकत बहुमत मिळविले आहे. मात्र, अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी आवश्यक असलेल्या १४ संचालकांच्या कोरमचा प्रश्न निर्माण झाल्याने महायुतीच्या संचालकांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

Advertisement

शिरगाव येथील गोकुळच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होईल. गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष निवडीची सभा होणार आहे. समविचारी आघाडीकडे १३ संचालकांचे संख्याबळ असल्याने सभेचे कामकाज पूर्ण करण्यासाठी आणखी एका संचालकाची उपस्थिती आवश्यक आहे. त्यामुळे महायुतीचे संचालक सभेला उपस्थित राहणार की अनुपस्थित राहून निवड प्रक्रियेत अडथळा निर्माण होणार, याबाबत उत्सुकता आहे.

प्रशासनाची तयारी पूर्ण
अध्यक्ष निवडीसाठी होणाऱ्या सभेची प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. संचालक मंडळाच्या सभागृहात सभा होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनीही याठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे. महायुतीकडून अध्यक्षपदासाठी उमेदवार देण्याची रणनीती आखली जाणार का? याचीही चर्चा सुरू आहे.

Advertisement

बहुमताचा आदर करून लोकशाही प्रक्रियेनुसार निवड होऊ द्यायची की अध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार उतरवायचा, याबाबतचा निर्णय महायुती घेणार आहे. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या बैठकीत कोणती भूमिका घेतली जाते, यावर अध्यक्ष निवडीची पुढील दिशा अवलंबून असेल. महायुतीचे संचालक, त्यांची उपस्थिती आणि अध्यक्षपदासाठी उमेदवारी याभोवतीच आजच्या राजकीय घडामोडी केंद्रित राहणार आहेत.

सलग तीन गैरहजेरी संचालकपदाला धोकादायक
'गोकुळ च्या अध्यक्ष निवडीसाठी सर्व संचालकांना सभेची नोटीस पाठविण्यात आली आहे. मात्र, कोरमचा पेच निर्माण झाल्यास सभा तहकूब करण्याची वेळ येऊ शकते, अशा परिस्थितीत सभाध्यक्षांना नियमानुसार पुढील सभेची तारीख जाहीर करता येईल, मात्र, सलग तीन सभांना विनाकारण अनुपस्थित राहिल्यास संबंधित संचालकांचे पद धोक्यात येऊ शकते. त्यामुळे अध्यक्ष निवडीच्या राजकीय संघर्षात सहकार कायद्यातील तरतुदीही महत्त्वाच्या ठरणार आहेत.

Advertisement
Tags :

.