गोकुळ अध्यक्ष निवड: महायुतीच्या बैठकीला संचालक वीरेंद्र मंडलिकांची दांडी? राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण
कोल्हापूर: गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरून राजकीय वातावरण तापले असतानाच शनिवारी दिवसभर अनेक घडामोडींना वेग आला. महायुतीच्या प्रमुख नेत्यांसह गोकुळमधील संचालकांची बैठक झाल्याची माहिती समोर आली. मात्र, या बैठकीला संचालक वीरेंद्र मंडलिक अनुपस्थित असल्याची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्काना उधाण आले. सोशल मीडियावरही 'वीरेंद्र मंडलिक यांची बैठकीला दांडी" अशा आशयाचे संदेश व्हायरल झाले. दरम्यान, या चर्चेवर स्वतः वीरेंद्र मंडलिक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एका नातेवाईकाच्या कार्यक्रमानिमित्त आपण बेळगाव येथे असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आपल्या अनुपस्थितीचा राजकीय अर्थ काढण्यात तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा वाद उच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर न्यायालयाने महायुतीच्या १२ संचालकांना उपस्थित राहून आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी आणि गोकुळमधील संचालकांनी पुढील रणनीतीबाबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलावल्याची माहिती आहे. मात्र, या महत्त्वाच्या घडामोडींच्या वेळी मंडलिक उपस्थित नसल्याने त्यांच्या भूमिकेबाबत चर्चा रंगू लागली. त्यामुळे अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील प्रत्येक हालचालीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
