For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

गोकुळ अध्यक्ष निवडीवर २ नोव्हेंबरला सुनावणी; १३ संचालकांची सर्किट बेंचमध्ये याचिका

10:16 AM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोकुळ अध्यक्ष निवडीवर २ नोव्हेंबरला सुनावणी  १३ संचालकांची सर्किट बेंचमध्ये याचिका
Advertisement

कोल्हापूर: गोकुळ अध्यक्ष निवडीवरून निर्माण झालेला कायदेशीर पेच आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे. अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी (२ नोव्हेंबर) होणार असून, याचिका 'फर्स्ट ऑन बोर्ड' घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

Advertisement

गोकुळचे नवनिर्वाचित अध्यक्ष शशिकांत पाटील-चुयेकर आणि त्यांच्यासह समविचारी आघाडीच्या एकूण १३ संचालकांनी ही याचिका दाखल केली आहे. २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या अध्यक्ष निवडीच्या समेत पीठासीन अधिकाऱ्यांनी सभेचा वृत्तांत योग्य पद्धतीने आणि पूर्णपणे नोंदविला नसल्याचा आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे. या सभेत १३ संचालकांच्या उपस्थितीत चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे या निवडीची नोंद ग्राह्य धरून प्रशासकांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी आणि चुयेकर यांच्याकडे अध्यक्षपदाचा पदभार सोपवावा, असे निर्देश देण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

दरम्यान, सुनावणीवेळी सभेला अनुपस्थित राहिलेले महायुतीचे १२ संचालक आणि राज्य शासन यांनाही आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने या सर्वांना याचिकेत पक्षकार म्हणून समाविष्ट करण्याचे निर्देश दिले. तसेच, राज्य शासन अथवा अन्य कोणत्याही घटकाने या प्रकरणात पुढील कार्यवाही केल्यास ती न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाचा तिढा तूर्त कायम असून, सोमवारी होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. समविचारी आघाडीच्यावतीने अॅड. श्रीकृष्ण गणबावले यांनी बाजू मांडली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.