For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

गोकुळ अध्यक्ष निवडीचा पेच न्यायालयात; शासन नियुक्त संचालकांवरून महायुतीत नाराजी; सतेज पाटील यांचा स्वीकृत संचालकांच्या मतदानावर आक्षेप

06:13 PM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोकुळ अध्यक्ष निवडीचा पेच न्यायालयात  शासन नियुक्त संचालकांवरून महायुतीत नाराजी  सतेज पाटील यांचा स्वीकृत संचालकांच्या मतदानावर आक्षेप
Advertisement
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू झालेला पेच आता न्यायालयात पोहोचला आहे. गोकुळच्या पोटनियमांचा आधार घेत महायुतीच्या 12 संचालकांनी अध्यक्ष निवडीच्या बैठकीला अनुपस्थिती दर्शवल्यानंतर हा वाद निर्माण झाला. या प्रकरणात न्यायालयाने 10 नोव्हेंबर रोजी संबंधितांना बैठकीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. मात्र, उपस्थित राहण्याबाबत कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही.

दरम्यान, गोकुळमध्ये शासन नियुक्त संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार देत सत्ता मिळवण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या संभाव्य नियुक्त्यांवरून महायुतीतील मित्रपक्षांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

शासन नियुक्त संचालकांच्या नावांवरून वाद

गोकुळमध्ये शासन नियुक्त संचालक म्हणून हसन मुश्रीफ यांचे पुत्र नवीद मुश्रीफ, माजी संचालिका शौमिका महाडिक आणि अशोक फरकटे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. ही नावे समोर आल्यानंतर महायुतीतील मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केली असून जिल्ह्यातील नेत्यांकडे आपली भूमिका मांडली आहे.

महायुतीमध्ये शासन नियुक्त सदस्यांच्या निवडीत मित्रपक्षांनाही संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आता चर्चेत असलेल्या नावांमुळे मित्रपक्षांना संधी मिळणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेत्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनाच प्राधान्य मिळणार असल्याने मित्रपक्षांची पाटी रिकामी राहण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या पक्षांनी आपली नाराजी स्पष्टपणे नेत्यांपर्यंत पोहोचवली आहे.

Advertisement

सतेज पाटील यांचा स्वीकृत संचालकांच्या मतदानावर आक्षेप

गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी राज्यातील माध्यमांना पत्र लिहून लोकशाही प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

जर अशा पद्धतीने जनमत फिरवले जाणार असेल, तर निवडणुका घ्यायच्याच कशाला, असा उद्विग्न सवाल पाटील यांनी केला आहे. गोकुळमध्ये घडत असलेला प्रकार उद्या राज्यातील अन्य संस्थांमध्येही घडू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू झालेला हा वाद आता न्यायालयीन प्रक्रियेसह महायुतीतील अंतर्गत नाराजीमुळे अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. 10 नोव्हेंबरच्या बैठकीकडे आणि शासन नियुक्त संचालकांच्या संभाव्य निवडीकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.