महायुतीचे नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्याआधीच सतेज पाटलांनी उचलले मोठे पाऊल; हसन मुश्रीफांशी चर्चा! गोकुळचं गणित सोडवलं?
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले, तर समविचारी पॅनेलने १३ जागा जिंकल्या. त्यामुळे समविचारी आघाडीला बहुमत मिळाले असले, तरी अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राजकीय घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत. येत्या २९ ऑक्टोबरला नवनिर्वाचित संचालक अध्यक्षाची निवड करणार आहेत.
फडणवीस यांच्या भेटीकडे लक्ष
गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीकडून अध्यक्षपदासाठी उमेदवार दिला जाणार का, याबाबतही उत्सुकता आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही.
‘महायुतीचे नेते सहकार्य करतील’
दरम्यान, सतेज पाटील यांनी अध्यक्षपदाच्या निवडीवरून वेगळे राजकीय समीकरण निर्माण होण्याची शक्यता कमी असल्याचे मत व्यक्त केले आहे. हसन मुश्रीफ, विनय कोरे आणि चंद्रदीप नरके यांच्याशी आपली चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. गोकुळचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या मुलाला अध्यक्ष करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शासनमान्य किंवा स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार नसल्याचे सांगत, सहकारी संस्थांच्या निवडणुकीतील नियमांचे पालन होणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षपदाच्या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष
गोकुळच्या निवडणुकीत मिळालेल्या बहुमतानंतर समविचारी पॅनेलचा अध्यक्ष होणार का, की महायुतीकडून वेगळी रणनीती आखली जाणार, याची चर्चा सुरू आहे. सतेज पाटील यांनी महायुतीतील नेत्यांशी झालेल्या चर्चेचा उल्लेख केल्याने अध्यक्षपदाची निवड बिनविरोध होणार की निवडणूक रंगणार, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. २९ ऑक्टोबरच्या निवड प्रक्रियेतच गोकुळच्या नेतृत्वाबाबत अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
