सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच महायुतीने केले ! गोकुळमध्ये चार शासकीय सदस्य येणार, तीन नांव ठरली? फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
गोकुळच्या सत्तासमीकरणात बदल घडवण्यासाठी महायुतीकडून नवी रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. संघावर चार शासकीय सदस्य नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू असून, त्यांच्या मतदानाच्या अधिकाराबाबतही महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमुळे अध्यक्षपदाची निवड अधिकच रंजक बनली आहे.
शासकीय सदस्यांच्या नियुक्तीकडे लक्ष
गोकुळवर शासकीय सदस्य म्हणून शौमिका महाडिक, नविद मुश्रीफ आणि अशोक फराकटे यांच्या नावांची चर्चा असून, चौथ्या सदस्याचे नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. या नियुक्त्यांमुळे अध्यक्षपदाच्या निवडीत महायुतीला अतिरिक्त बळ मिळू शकते, असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे.
मतदानाच्या अधिकारावर कायदेशीर पेच
सहकार कायद्यातील सध्याच्या तरतुदीनुसार शासकीय सदस्यांना मतदानाचा अधिकार नसल्याचे सांगितले जाते. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडीत त्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी सरकारकडून वटहुकूम काढण्याची शक्यता चर्चेत आहे. असा निर्णय झाल्यास गोकुळमधील सत्तेचे गणित बदलू शकते.
कोरमचा मुद्दा ठरणार निर्णायक
गोकुळच्या निवडणुकीत समविचारी आघाडीचे १३, तर महायुतीचे १२ संचालक निवडून आले होते. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आवश्यक कोरम १४ संचालकांचा असल्याने समविचारी आघाडीसमोर उपस्थिती आणि संख्याबळ टिकवण्याचे आव्हान आहे. या परिस्थितीचा फायदा महायुती घेण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, शासकीय सदस्यांच्या नियुक्त्या, मतदानाच्या अधिकाराबाबत संभाव्य निर्णय आणि अध्यक्षपदाची निवड यामुळे गोकुळच्या राजकारणात पुढील काळात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचे लक्ष या निवडीकडे लागले आहे.
