For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक 10 नोव्हेंबरला; कोल्हापूर सर्किट बेंचचा आदेश; निवडणूक निर्णय अधिकारी आणि महायुतीला न्यायालयाचा दणका

05:55 PM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक 10 नोव्हेंबरला  कोल्हापूर सर्किट बेंचचा आदेश  निवडणूक निर्णय अधिकारी आणि महायुतीला न्यायालयाचा दणका
Advertisement
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू असलेला कायदेशीर पेच अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. कोल्हापूर सर्किट बेंचने सोमवारी (2 नोव्हेंबर) निवडणूक निर्णय अधिकारी आणि महायुतीला दणका देत 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने सात दिवसांची नोटीस देऊन निवडणूक घ्यावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी नियमावलीनुसार 14 संचालकांची गणपूर्ती आवश्यक आहे. मात्र, ही संख्या पूर्ण न झाल्याने 29 ऑक्टोबर रोजी बोलावण्यात आलेली पहिली बैठक तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर समविचारी आघाडीने समांतर सभा घेत शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केली होती. या निवडीवरून कायदेशीर पेच निर्माण झाला होता.

Advertisement

अध्यक्षपदासाठी महायुती आणि समविचारी आघाडीत संघर्ष

गोकुळची निवडणूक 18 ऑक्टोबर रोजी झाली, तर 19 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाला. एकूण 25 संचालकांपैकी महायुतीला 12 जागा मिळाल्या, तर सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने 13 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीसाठी समविचारी आघाडीचे पारडे जड असल्याचे चित्र निर्माण झाले होते.

मात्र, गोकुळच्या नियमावलीतील पोटनियमाचा दाखला देत महायुतीने 29 ऑक्टोबर रोजी झालेल्या अध्यक्ष निवडीच्या बैठकीला अनुपस्थिती दर्शवली. त्यामुळे गणपूर्तीअभावी अध्यक्षपदाची निवड होऊ शकली नव्हती. गोकुळच्या पोटनियमानुसार सलग तीन बैठकींना संचालक अनुपस्थित राहिल्यास त्यांचे संचालकपद आपोआप रद्द होण्याची तरतूद असल्याने या मुद्द्यावरही राजकीय व कायदेशीर चर्चा सुरू होती.

Advertisement

महायुतीकडून अध्यक्षपदासाठी राजकीय हालचाली

सतेज पाटील यांच्या आघाडीला अध्यक्षपद मिळू नये, यासाठी महायुतीकडून मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली सुरू असल्याची चर्चा होती. मुंबईपासून कोल्हापूरपर्यंत यासंदर्भात प्रयत्न सुरू असल्याचेही समोर आले होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोकुळमध्ये शासन आणि तज्ज्ञ नियुक्त संचालक वाढवण्यासंदर्भात 16 ऑक्टोबर रोजी पत्र लिहिल्याचे समोर आले होते. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार देऊन महायुतीचा अध्यक्ष बसवता येतो का, याबाबतही चर्चा सुरू होती.

मात्र, आता कोल्हापूर सर्किट बेंचच्या आदेशामुळे अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया राबवणे बंधनकारक होणार आहे. 10 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत गोकुळच्या अध्यक्षपदावर कोण विराजमान होणार, याकडे सहकार आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.