गोकुळ चेअरमन अरुण डोंगळे शिवसेनेत !
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सह. दूध संघ, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा शिवसेना शिंदेगटातील प्रवेश निश्चित झाला असून लवकरच ते पक्षप्रवेश करणार आहेत. डोंगळे यांनी बुधवारी मुंबईत शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये गोकुळ चेअरमन पद व पक्ष प्रवेशाबाबत दीर्घकाळ चर्चा झाली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी डोंगळे यांना चेअरमन पदाचा राजीनामा न देण्याबाबत सांगितले आहे. त्यामुळे गोकुळमध्ये आता राजकीय भूकंप होणार असून पुढील वर्षभरासाठी डोंगळे यांच्याकडेच चेअरमन पद कायम राहणार आहे.
गोकुळमध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक आणि स्व. आमदार पी. एन. पाटील यांच्या तीन दशकांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावत आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळमध्ये प्रथमच सत्ता मिळविली. या सत्तांतरामध्ये ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. त्यामुळे गोकुळचे चेअरमन पद पहिले दोन वर्ष विश्वास पाटील यांना तर त्यानंतरची दोन वर्ष अरुण डोंगळे यांना चेअरमन पद देण्यात आले. फॉर्म्युल्यानुसार डोंगळे यांच्या पदाची मुदत 25 मे रोजी संपत आहे. त्यामुळे गोकुळमध्ये सध्या चेअरमन बदलाचे वारे वाहू लागले आहे. चेअरमन बदल होणार आणि आमदार सतेज पाटील गटाचा संचालक पुढील वर्षभरासाठी चेअरमन असणार हे निश्चत मानले जात होते. मात्र बुधवारी मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदे आणि चेअरमन डोंगळे यांच्या भेटीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली. चेअरमन पदाचा राजीनामा न देण्याबाबत उपमुख्यमंत्री यांनी सूचना दिल्याने आता गोकुळचे राजकारणच बदलून जाण्याची दाट शक्यता आहे.
- पालकमंत्री आबिटकर यांची भूमिका महत्त्वाची
चेअरमन डोंगळे यांनी लोकसभा, विधासभा निवडणुकीत महायुतीचा प्रामाणिक प्रचार केला. विधानसभा निवडणुकीत आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विजयात डोंगळे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे आबिटकर आणि डोंगळे यांच्यामध्ये जवळीक वाढली असून डोंगळे यांना शिवसेनेत आणण्यासाठी पालकमंत्री आबिटकर आग्रही होते. डोंगळे यांच्या पक्षप्रवेशामध्ये पालकमंत्री आबिटकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
- मंत्री मुश्रीफ, आमदार पाटील यांना धक्का
माजी आमदार महाडिक, स्व. आमदार पी. एन. पाटील यांच्या सत्ताधारी आघाडीला रामराम ठोकत गोकुळमध्ये सत्तांतर घडविण्यात चेअरमन अरुण डोंगळे आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. चेअरमन डोंगळे हे मंत्री हसन मुश्रीफ यांचे तर ज्येष्ठ संचालक पाटील हे आमदार सतेज पाटील यांचे विश्वासू आहेत. गेल्या चार वर्षात त्यांनी विरोध गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची भूमिका चोख बजावली आहे. तसेच गोकुळच्या महिनाभरापूर्वी झालेल्या पेट्रोल पंप उद्घाटनाच्या कार्यक्रमात डोंगळे यांनी स्वत: सहकारात पक्षीय राजकारण नसते असे जाहीरपणे सांगत मंत्री मुश्रीफ, आमदार पाटील यांनी गोकुळमध्ये एकत्रित कारभार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र डोंगळे यांचा शिवसेना प्रवेश निश्चित मानला जात असल्याने त्यांची ही राजकीय भूमिका मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्यासाठी धक्कादायक असणार आहे.
- गोकुळमधील राजकीय समीकरणे बदलणार
चेअरमन डोंगळे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर गोकुळमधील राजकीय समिकरणेच बदलणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार डोंगळे यांनी आज गुरुवार 15 रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमन पदाचा राजीनामा न दिल्यास गोकुळमध्ये अप्रत्यक्षरित्या महायुतीची सत्ता असणार आहे. याचा परिणाम वर्षभरावर असलेल्या गोकुळच्या निवडणुकीवर होणार आहे.
- उपमुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिये (ता.करवीर) येथे आयोजित भव्य वारकरी संमेलनाच्या सांगता समारंभासाठी आज गुरुवार 15 रोजी सायंकाळी कोल्हापुरात येणार आहेत. या कार्यक्रमप्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत चेअरमन अरुण डोंगळे शिवसेनेत प्रवेश करणार का, याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.
- मी महायुती सोबतच
जिल्ह्याच्या राजकारणात मी पहिल्यापासूनच महायुतीसोबत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुती उमेदवाराचा प्रामाणिक प्रचार केला. महायुतीचा झेंडा खांद्यावर घेऊन राजकारण करत आहे. पुढील काळातील वाटचालही महायुतीसोबतच राहणार आहे.
- अरुण डोंगळे, चेअरमन गोकुळ.