गोकाक संघ, टिळकवाडी क्लब विजयी
सिगन चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : सिगन स्पोर्ट्स क्लब आयोजित सिगन चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत गोकाक क्लबने प्लेअर चॉईस संघाचा तर टिळकवाडी संघाने एमसीसीचा पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. अश्विन सुणगार याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. एसकेई मैदानावरती खेळविण्यात आलेल्या गोकाक संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी बाद 172 धावा केल्या. त्यात बनसील पांडेने 3 षटकार 10 चौकारासह 82, पुरुषोत्तमने 3 चौकारासह 22, युसुफने 2 चौकारासह 19 धावा केल्या. प्लेअर चॉईस संघातर्फे चेतन व आक्रम यांनी प्रत्येकी 2 तर साहीलने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना प्लेअर चॉईस संघाचा डाव 17.2 षटकात 107 धावांत आटोपला. त्यात अक्षयने 2 षटकार व 7 चौकारासह 59, चेतनने 2 चौकारासह 15 धावा केल्या. गोकाकतर्फे आनंद, पुरूषोत्तम, बनसील पांडे व युसुफ यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
जिमखाना मैदानावरती खेळविण्यात आलेल्या सामन्यात युनायटेड बालाजी संघाने प्रथम फलंदाजी करताना 15.5 षटकात सर्व बाद 118 धावा केल्या. त्यात देवीदास कम्मारने 7 चौकारासह 39, राहुल सुरेकरने 4 चौकारासह 23, ओमकारने 3 चौकारासह 25 धावा केल्या. टिळकवाडीतर्फे कुनाल हिरोजी, रवी पिल्ले यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना टिळकवाडीने 14.4 षटकात 4 गडी बाद 121 धावा करुन सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यात शुभम यादवने 1 षटकार 4 चौकारासह 50, रवी पिल्लेने 2 षटकार 2 चौकारासह 40 धावा केल्या. युनायटेड बालाजीतर्फे अजित, वासु व सुनील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. तिसऱ्या सामन्यात गोकाक क्रिकेट क्लबने एमसीसीचा 6 गड्यांनी पराभव केला. एमसीसीने प्रथम फलंदाजी करताना 12 षटकात सर्वगडी बाद 60 धावा केल्या. त्यांचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. गोकाकतर्फे अश्विन सुणगारने 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना गोकाकने 9.3 षटकात 4 गडी बाद 62 धावा करुन सामना 6 गड्यांनी जिंकला. अश्विनने 16, शेखरने 20 धावा केल्या.