For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गॉफ, स्वायटेक उपांत्य फेरीत, मेदव्हेदेव पराभूत

06:52 AM Jun 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
गॉफ  स्वायटेक उपांत्य फेरीत  मेदव्हेदेव पराभूत
Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

2024 च्या टेनिस हंगामातील येथे सुरु असलेल्या प्रेंचे ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिलांच्या विभागात पोलंडची टॉप सिडेड आणि विद्यमान विजेती इगा स्वायटेक तसेच अमेरिकेच्या कोको गॉफ यांनी एकेरीची उपांत्य फेरी गाठली. ट्युनेशियाच्या जेबॉर आणि झेकच्या व्होंड्रोसोव्हा यांचे आव्हान समाप्त झाले. पुरुषांच्या विभागात रशियाच्या मेदव्हेदेवचे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी. मिनॉरने संपुष्टात आणले. जोकोविचने ग्रँडस्लॅम स्पर्धेतील आपला विक्रमी 370 वा सामना जिंकला.

महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पोलंडच्या स्वायटेकने झेकच्या मर्केटा व्होंड्रोसोव्हाचा 6-0, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये केवळ 62 मिनिटात फडशा पाडत शेवटच्या 4 खेळाडूत स्थान मिळविले. आता स्वायटेक आणि अमेरिकेची गॉफ यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल. दुसऱ्या एका सामन्यात अमेरिकेच्या तृतीय मानांकित कोको गॉफने ट्युनेशियाच्या जोबॉरचा 4-6, 6-2, 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. गेल्या सप्टेंबरमध्ये गॉफने अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. गॉफ आणि स्वायटेक यांच्यात आतापर्यंत 11 सामने झाले असून त्यापैकी 10 सामने स्वायटेकने जिंकले आहेत. या स्पर्धेत रशियाची नवोदित मिरा अँड्रीव्हाने महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना फ्रान्सच्या ग्रेचेव्हाचा 7-5, 6-2 असा पराभव केला. या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठणारी अँड्रीव्हा ही सर्वात कमी वयाची महिला टेनिसपटू आहे. तिने हा पराक्रम आपल्या वयाच्या 17 वर्षे आणि 27 दिवस असताना केला.

Advertisement

पुरुषांच्या विभागातील खेळविण्यात आलेल्या चौथ्या फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी. मिनॉरने माजी अमेरिकन ग्रँडस्लॅम विजेता रशियाचा डॅनिल मेदव्हेदेवचा 4-6, 6-2, 6-1, 6-3 असा पराभव करत शेवटच्या 8 खेळाडूत स्थान मिळविले. या स्पर्धेत पहिल्यांदाच मिनॉरने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. सर्बियाच्या टॉप सिडेड जोकोविचने चौथ्या फेरीतील सामन्यात सेरुनडोलोचा 5 सेट्समधील लढतीत पराभव करुन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील आपला विक्रमी 370 वा विजय नोंदविला. जोकोविचने हा पराक्रम करताना स्विसच्या माजी रॉजर फेडररचा विक्रम मोडीत काढला. जोकोविचने ग्रँडस्लॅम स्पर्धेत 59 व्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथिदार मॅथ्यूज एबडन यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. रोहन व एबडन यांनी श्रीराम बालाजी व जोरेन व्हिलिगेन यांचा 6-7 (2-7), 6-3, 7-6 (10-8) असा पराभव केला. हा दुहेरीचा सामना अडीच तास चालला होता. बालाजीने मेक्सिकन साथिदारासमवेत बोपण्णाला चांगलेच झुंजविले.

Advertisement
Tags :

.