For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गॉफ, स्वायटेक उपांत्यपूर्व फेरीत दाखल

06:36 AM Jun 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
गॉफ  स्वायटेक उपांत्यपूर्व फेरीत दाखल
Advertisement

जोकोविच, मेदव्हेदेव यांचा चौथ्या फेरीत प्रवेश

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

2024 च्या टेनिस हंगामातील येथे सुरु असलेल्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत अमेरिकेची कोको गॉफ आणि पोलंडची टॉप सिडेड इगा स्वायटेक यांनी महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र सर्बियाच्या टॉप सिडेड जोकोविचला चौथी फेरी गाठताना विजयासाठी झगडावे लागले. जोकोविचने इटलीच्या मुसेटीचा पराभव केला. रशियाच्या मेदव्हेदेवने एकेरीची चौथी फेरी गाठली.

Advertisement

रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात अमेरिकेतील तृतीय मानांकित कोको गॉफने इटलीच्या इलिसाबेटा कॉकीरेटोचा 6-1, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत शेवटच्या 8 खेळाडूत स्थान मिळविले. या सामन्यात गॉफच्या वेगवान सर्व्हिसवर इटलीच्या इलिसाबेटाला परतीचे फटके मारताना अवघड झाल्याने तिच्याकडून वारंवार चुका झाल्या. गॉफने गेल्या वर्षी अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती. तर 2022 साली तिने फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा 2015 नंतर अमेरिकन महिला टेनिसपटूला जिंकता आलेली नाही. 2015 साली सेरेना विलियम्सने या स्पर्धेत जेतेपद मिळविले होते. गॉफचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना ट्युनेशियाची जेबॉर आणि डेन्मार्कची टॉसन यांच्यातील विजयी खेळाडू बरोबर होईल.

महिला एकेरीच्या चौथ्या फेरीतील अन्य एका सामन्यात पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकला विजय मिळविण्यासाठी अधिक झगडावे लागले नाही. स्वायटेकने चौथ्या फेरीतील सामन्यात रशियाच्या पोटोपोव्हाचा केवळ 40 मिनिटात 6-0, 6-0 असा एकतर्फी फडशा पाडला. या संपूर्ण सामन्यात पोटोपोव्हाला एकही गेम जिंकता आला नाही. स्वायटेकने पहिला सेट केवळ 19 मिनिटात तर दुसरा सेट 21 मिनिटात जिंकला. स्वायटेक या स्पर्धेतील विद्यमान विजेती आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना व्होंड्रोसोव्हा आणि सर्बियाची डॅनीलोव्हिक यांच्यातील विजयी खेळाडूबरोबर होईल.

पुरुष एकेरीच्या रविवारी झालेल्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात इटलीच्या 22 वर्षीय मुसेटीने सर्बियाच्या टॉप सिडेड जोकोविचला विजयासाठी तब्बल साडेचार तास झगडविले. जोकोविचला या सामन्यात पाच सेट्सपर्यंत खेळ केला. जोकोविचने मुसेटीचा 7-5, 6-7 (6-8), 2-6, 6-3, 6-0 असा पराभव करत चौथ्या फेरीत प्रवेश केला. जोकोविच या स्पर्धेतील विद्यमान विजेता असून त्याला यावेळी पहिल्या फेरीपासूनच विजयासाठी झगडावे लागत आहे. जोकोविचने आतापर्यंत 3 वेळेला प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली असून आता तो आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीतील विक्रमी 25 व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. अन्य एका सामन्यात रशियाच्या पाचव्या मानांकित डॅनिल मेदव्हेदेवने टॉमस मॅकहेकचा 7-6 (7-4), 7-5, 1-6, 6-4 असा पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. अलिकडेच झालेल्या जिनिव्हा टेनिस स्पर्धेत मॅकहेकने टॉप सिडेड जोकोविचला पराभवाचा धक्का दिला होता. मेदव्हेदेव आणि मॅकहेक यांच्यातील हा सामना साडेतीन तास चालला होता.

Advertisement

.