साबालेंकाला हरवून गॉफ अंतिम फेरीत
वृत्तसंस्था / रियाद
2024 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या डब्ल्युटीए टूरवरील महिलांच्या फायनल्स टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या कोको गॉफने टॉप सिडेड आर्यना साबालेंकाचा पराभव करत पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत साबालेंकाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले असले तरी 2024 अखेरीस महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत तिचे अग्रस्थान कायम राहिल. आता गॉफ आणि चीनची झेंग क्विनवेन यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गॉफने साबालेंकाचा 7-6(7-4), 6-3 अशा सरळ सेटसमध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. मात्र डब्ल्युटीए टूरवरील प्रत्येक वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या या फायनल्स स्पर्धेत पहिल्यांदा जेतेपद मिळविण्याची साबालेंकाची संधी हुकली आहे. दुसऱ्या एका उपांत्य फेरीच्या सामन्यात चीनच्या सातव्या मानांकित झेंग क्विनवेनने झेकच्या क्रेसिकोव्हाचा 6-3, 7-5 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणारी चीनची झेंग पहिल्यांदाच या स्पर्धेत आपल्या पदार्पणात अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.