गोदरेज प्रॉपर्टीजच्या फ्लॅट बुकिंगला वाढता प्रतिसाद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सोमवारी मोठ्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात मंगळवारी पुन्हा चांगली तेजी परतली होती. सकाळी 11.32 मिनीटांनी निफ्टी निर्देशांक 193 अंकाच्या वाढीसोबत 22335 अंकांवर व्यवहार करत होता. या तेजीच्या सत्रात मंगळवारी रियल इस्टेट क्षेत्रातील कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड यांच्या समभागांनी चांगली चमक दाखवली.
सकाळी गोदरेज प्रॉपर्टीजचे समभाग 6 टक्के इतके वाढत 2052 रुपयांवर पोहचले होते. मागच्या सोमवारी समभाग 1927 च्या भावावर बंद झाले होते. गोदरेजच्या समभागांची खरेदी मोठ्या प्रमाणात मंगळवारी दिसून आली आहे, त्याचे कारण कंपनीने आर्थिक वर्षात मार्च तिमाहीत चांगला व्यवसाय प्राप्त केला असल्याचे सांगितले जात आहे. मार्च 2025 च्या तिमाहीत फ्लॅट बुकिंगला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद नेंदवला आहे.
मार्च तिमाहीत 10 हजार कोटी प्राप्त
मार्च तिमाहीत 10163 कोटी रुपयांच्या फ्लॅटचे ग्राहकांनी बुकिंग केले असल्याची माहिती आहे. मागच्या तिमाहीच्या तुलनेत बुकिंगमध्ये 87 टक्के इतकी वाढ दिसली आहे. वर्षाच्या आधारावर पाहता वाढ 7 टक्के इतकी आहे. कंपनीने 3703 फ्लॅटची विक्री करत वरील कामगिरी पार पाडली आहे. सलग सातव्या तिमाहीत कंपनीने 5 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचे बुकिंग करण्यामध्ये यश साध्य केले आहे.