ईश्वरीतत्व मनोवाणीरहित किंबहुना त्याही पलीकडचे आहे
अध्याय नववा
जो मनुष्य सुखदु:ख, रागलोभ आदि विकारांपासून मुक्त असतो त्याला क्षेत्रक्षेत्रज्ञाचे ज्ञान होते असं बाप्पांनी सांगितल्यावर मलाही ते ज्ञान उलगडून सांगा अशी वरेण्याने बाप्पांना विनंती केली आणि बाप्पांनी ती स्वीकारली. कारण राजा, विकारमुक्त असल्याने क्षेत्रक्षेत्रज्ञ विचार समजून घेण्याची राजाची कुवत आहे हे बाप्पांना माहीत होते. राजाच्या विनंतीनुसार, बाप्पा त्याला उपदेश करत आहेत. ते म्हणाले विकारमुक्त माणसाला सर्वांच्यातल्या ईश्वरी अस्तित्वाची जाणीव होत असते. त्यामुळे समोरचा माणूस त्याच्याशी कसाही वागला तरी तो स्वत:च्या प्रारब्धाचा भाग समजून, त्याच्याशी स्नेहानेच वागत असतो. तान्हे मूल सगळ्यांच्याकडे पाहून हसत असते कारण ते विकारमुक्त असते.
तशीच मानसिकता साधूंची असल्याने ते क्षेत्रक्षेत्रज्ञ विचार जाणायला पात्र असतात. क्षेत्र म्हणजे आपले शरीर. ते पंचमहाभूतांचे बनलेले असून, त्याची दहा इंद्रिये, ज्ञानेंद्रियांचे विषय तसेच मन, बुद्धी, चित्त आणि अहंकारयुक्त अंत:करण यांचा यात समावेश होतो तर क्षेत्रज्ञ म्हणजे हे क्षेत्र चालवणारा परमात्मा होय. या क्षेत्राचं म्हणजे शरीराचं नियंत्रण करणारा परमात्मा किंवा परमेश्वर अत्यंत सूक्ष्म असून त्याला जाणून घेण्यासाठी मनाची, बुद्धीची पूर्वतयारी हवी.
ब्रह्मस्वरूप हेच विश्वामध्ये जाणण्यास योग्य आहे व ते कायम टिकणारे असून अमर्याद आहे. ईश्वरीस्वरूप मनोवाणीरहित किंबहुना त्याही पलीकडचे आहे. हे स्वरूप ज्ञानामुळे प्रकट होते. ते जाणून घेतले की, मनुष्य मायाजालातून मुक्त होतो. त्यासाठी ईश्वराची अनन्य भक्ती करणे आवश्यक आहे. अनन्य भक्त ईश्वराच्या सतत अनुसंधानात असतो. अशा मन:स्थितीत मोक्ष मिळवण्याची पात्रता अंगी येण्यासाठी ईश्वरी तत्व समजून घेणे आवश्यक आहे. त्याबद्दल बाप्पा ज्या श्लोकात सांगत आहेत त्या श्लोकाचा आपण अभ्यास करत आहोत तो श्लोक असा, तज्ञानविषयं राजन्ब्रवीमि त्वं शृणुष्व मे । यज्ञात्वैति च निर्वाणं मुक्त्वा संसृतिसागरम् ।।26।। त्यानुसार ईश्वरी तत्व समजून घेण्यासाठी सरलता, गुरूपासून ज्ञान श्रवण करण्याची इच्छा, इंद्रियांच्या विषयांपासून विरक्ति, शौच, शान्ति, दंभाचा अभाव, जन्म व मृत्यु हे दोष आहेत असे जाणणे, समान दृष्टि, दृढ भक्ति, एकान्तवास, शम, दम ही लक्षणे आवश्यक आहेत.
बाप्पा वरेण्याला म्हणाले, जर तू ईश्वरीतत्व समजून घेतलंस तर जन्म मरणाच्या फेऱ्यातूनही तुझी सुटका होईल. क्षेत्रक्षेत्रज्ञ ज्ञान त्यादृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. क्षेत्र म्हणजे शरीर किंवा देह होय हे एकवेळ समजू शकतं कारण ते डोळ्यांना दिसत असतं. परंतु शरीराचं नियंत्रण करणारा परमात्मा, अत्यंत सूक्ष्म असून त्यासाठी मनाची, बुद्धीची पूर्वतयारी हवी. ब्रह्मस्वरूप हेच विश्वामध्ये जाणण्यास योग्य आहे. ते कायम टिकणारे असून अमर्याद आहे. माझे स्वरूप मनोवाणी रहित किंबहुना त्याही पलीकडचे आहे. हे स्वरूप ज्ञानामुळे प्रकट होते ते जाणून घेतले की, मनुष्य मायाजालातून मुक्त होतो.
शब्दाच्या आधारे वस्तूचे नाम, रूप, गुण, धर्म, क्रिया, विकार याचे वर्णन करता येते पण परब्रह्मस्वरूप शब्दातून वर्णन करता येत नाही. म्हणून श्रुती नेती नेती असे सांगून हात टेकतात. मात्र परब्रह्मस्वरूप वर्णन करता येत नसले तरी प्राप्त केले जाऊ शकते. यावरून लक्षात येईल की, ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे व त्या ज्ञानाच्या बळावर ईश्वरीस्वरूप समजलेलं आहे तो बाहेरून चारचौघांसारखाच दिसतो. परंतु त्याची वर्तणूक इतरांच्यापेक्षा वेगळी असल्याने उठून दिसते.
क्रमश: