12 जुलैला प्रदर्शित होणार ‘गोध्रा’
27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रा रेल्वेस्थानकावर साबरमती एक्स्प्रेसला दहशतवाद्यांनी पेटवून दिले होते. या घटनेत 59 कारसेवकांचा जळून मृत्यू झाला होता. ज्यानंतर गुजरातमध्ये दंगली पेटल्या होत्या. आता दोन दशकांनंतर गोध्रा प्रकरणावर चित्रपट येत आहे. गोध्रा प्रकरणावर तयार करण्यात आलेला चित्रपट ‘अॅक्सिडेंट ऑर कॉन्सपिरेसी गोध्रा’चा ट्रेलर जारी करण्यात आला आहे. चित्रपटात रणवीर शौरीने मुख्य भूमिका साकारली आहे. वकिलाची भूमिका साकारत असलेला रणवीर शौरी न्यायालयात साबरमती एक्स्प्रेस जाळू दिली गेल्याचा युक्तिवाद करताना ट्रेलरमध्ये दिसून येतो. दहशतवादी रेल्वेचा डबा पेटवून देत होते, तेव्हा आरपीएफ कुठे होते? आग लागल्यावर अग्निशमन दल कुठे होते? हा कट नव्हता का असे प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. ओम त्रिनेत्र फिल्म्सच्या बॅनर अंतर्गत निर्मित गोध्रा चित्रपटाचे दिग्दर्शन एम.के. शिवाक्ष यांनी केले आहे. रणवीर शौरीसोबत या चित्रपटात अक्षिता नामदेव, मनोज जोशी, हितु कनौडिया, देनिशा घुमरा हे कलाकार दिसून येणार आहेत. हा चित्रपट 12 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.