सोनुर्ली येथील देवी माऊलीचा ६ नोव्हेंबर रोजी जत्रोत्सव
न्हावेली /वार्ताहर
दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर अशी ख्याती असलेल्या सोनुर्ली येथील प्रसिद्ध श्री माऊली देवीचा लोटांगणाचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार ६ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे.जत्रोत्सवासाठी पूर्ण सज्जता झाली असून मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.गुरुवारी पहाटे देवीची विधीवत पूजा झाल्यानंतर सकाळी ९ वाजता भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात येणार असल्याचे देवस्थान कमिटीकडून सांगण्यात आले.भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव म्हणजे भाविकांसाठी मोठी पर्वणीच असते.देवीचा उत्सव म्हटला की,त्याची लगबग कोजागिरी पौर्णिमेपासूनच सुरु होते.सद्यस्थितीत जत्रोत्सवाचे सर्व नियोजन करण्यात आले असून पोलीस यंत्रणेसह भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे.जत्रोत्सवासाठी सकाळी येणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता देवस्थान कमिटी व पोलीस यंत्रणा यांनी मिळवून वाहनतळाची सोय केली आहे.दूरवरून येणाऱ्या भाविक भक्तांना मंदिरापर्यंत जाण्यासाठी वेंगुर्ला शिरोडा बांदा व सावंतवाडी बसस्थानकातून जादा गाड्यांची सोय करण्यात आली आहे.जिल्हा परिषद बांधकाम विभागाने व ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडी तोडून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला आहे.भाविकांना दर्शन सुलभरित्या घेता यावे यासाठी स्वयंसेवकाची नेमणुक करण्यात आली आहे.भक्तांना मंदिर परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला आहे.सायंकाळी देवीची तरंगकाठी मळगाव येथून माऊली मंदिरात वाजत गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत आणण्यात आली.भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणेने वाहतुकीचे नियोजन केले आहे.सावंतवाडी सोनुर्लीकडे जाणाऱ्या एसटी बस व खाजगी प्रवासी वाहतुक कोंडुरा तिठा मार्गे सोडण्यात येणार आहे.बांद्याच्या दिशेने येणारी एसटी बसेस व खासगी वाहतूक बांदा निगुडेमार्गे सोडण्यात येणार आहे.सावंतवाडीच्या दिशेने येणारी चारचाकी दुचाकी वाहने निरवडे झरबाजार मार्गे सोडण्यात येण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पोलीस यंत्रणेने दिली.भाविकांनी पोलीस विभागाला सहकार्य करावे,असे आवाहन पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले आहे.जत्रोत्सवात वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.पोलिस अधिकारी,पोलीस कर्मचारी,वाहतूक,पोलिस,होमगार्ड असा बंदोबस्त गुरुवारी पहाटे सहा वाजल्या बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
भाविकांची गर्दी !
दक्षिण कोकणचे पंढरपूर श्री देवी माऊलीची मूर्ती सुबक व आकर्षक आहे.जत्रोत्सवानिमित्त सोन्या चांदीच्या दागिन्यांनी देवीला सजवले जाते.देवीचे हे सुवर्णालंकारांनी नटलेले मनोहारी रुप पाहण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात. जत्रोत्सवाला लाखो भाविकांची गर्दी असली तरी अतिशय शांततामय वातावरणात हा सोहळा होतो.अगाध महिमा असलेल्या माऊली देवीचे मंदिर नव्याने भव्यदिव्य उभारण्यात आले आहे.मोठ्या स्वरुपात खरेदी विक्री होते.एसटी महामंडळाच्या बस आणि खाजगी वाहनांतून लाखो भाविक गर्दी करतात.