देवा, बोला हो माझ्याशी
अबोला ही एक शक्ती आहे. कधी कल्याणकारी तर कधी गैरसमज वाढवून मने कलुषित करणारी. आईने धरलेला अबोला हा मुलांसाठी क्लेशदायी असतो खरा; परंतु त्यातून जो बोध होतो तो सतत बोलून, सांगून होत नाही. प्रेमाच्या माणसांचा अबोला सहन होत नाही. कधी कधी माणूस म्हणतो देखील की गालावर दोन चापट्या मारून सांगा काय झाले ते. पण...
हा अबोला सोडा. व्यवहारामधला अबोला भांडून, बोलून सुटतो परंतु परमार्थामधल्या अबोल्याचे काय? तो तर बरेचदा माणसाला कळत देखील नाही. देवालाही भक्ताला काहीतरी सांगायचे असते हे त्याच्या कक्षेत येत नाही. माणूस आपला भडाभडा एकतर्फी देवाशी बोलत असतो. बोलण्यापेक्षा गाऱ्हाणे सांगत असतो. एखाद्यालाच असे वाटते की देव का बरे आपल्याशी बोलत नाही? सोलापूरचे जुन्या पिढीतले कवी रा. ना. पवार यांचे एक हृदयस्पर्शी भावगीत आहे, ‘देवा बोला हो माझ्याशी / तुम्हीच मजवरी रुसल्यावरती बोलू मी कोणाशी?’ परमात्मा हा तर विश्व माऊली. त्यानेच बोलणे टाकले तर मग काय करायचे? कवी म्हणतात, ‘तुम्हीच मजला बोल शिकविले, आज मौन का तुम्ही घेतले?/ बोल शिकवूनी माय अबोला, धरिते काय पिल्लासी?’ भाव उच्चकोटीला पोचला की भक्ताची तळमळ देवालाही सहन होत नाही आणि तो भक्ताशी बोलतो. ही एकांतिक भाषा फक्त भक्ताला समजते.
माणसाच्या जीवनात ‘बोलणे’ ही एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे. लहान मुलाने लवकर बोलावे ही पालकांची इच्छा असते. त्याच्या बोबड्या बोलाचे कौतुक होते, परंतु कधी कधी आयुष्याच्या अखेरच्या पर्वात ही व्यक्ती आता न बोलता देवाघरी गेली तर बरे असे कुटुंबाला वाटते. ही काळाची शोकांतिका आहे. माणसाचे विचार त्याच्या वाणीत उतरतात. त्याच्या बोलण्यावरून त्याचे विचार आणि विचारांवरून पुढे सभोवतीचे सांस्कृतिक जग, कुळ आणि त्याच्या जीवनाचे प्रयोजन कळते. म्हणून तर आपल्या ऋषींनी स्तोत्र, प्रार्थना यांची रचना केली. जगण्याची आचारसंहिता सांगितली. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, ‘आम्ही वैकुंठवासी । आलो याची कारणासी। बोलिले जे ऋषी। साच भावे वर्ताया?’ महाराज म्हणतात, वैकुंठातून आम्हाला मृत्युलोकी यावे लागले कारण आमच्या ऋषींनी जो मार्ग सांगितला त्याचे श्रद्धेने व यथाविधीने आचरण कसे करावे हे जनमानसाला कळावे म्हणून. मार्ग अध्यात्माचा असो की संप्रदायाचा. त्यात दीर्घ काळाने षडरिपूंमुळे विकृती निर्माण होते. मूळ हेतू बाजूला राहतो. महाराज म्हणतात, ‘अर्थे लोपली पुराणे। नाश केला शब्दज्ञाने?’ दंभ, गर्व, अभिमान या विकारांच्या प्राबल्यामुळे ऋषी जे बोलले ते खरे ज्ञान लुप्त झाले. श्री तुकाराम महाराज अवताराचे प्रयोजन स्पष्ट करताना म्हणतात, ‘पिटू भक्तीचा डांगोरा। कळीकाळासी दरारा। तुका म्हणे करा। जयजयकार आनंदे?’ जनहो, रामकृष्णहरीचा आनंदाने जयजयकार करा.
मुकेपणा आणि मौन यांत मोठे अंतर आहे. विपरीत प्रसंगाला किंवा आप्तांच्या अकाली मृत्यूला सामोरी जाणारी व्यक्ती प्रचंड धक्क्याने काहीही बोलू शकत नाही. ती मूक होते. परंतु या मुकेपणात आकांत असतो. असे का? या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही. मौन हे शांत, सुंदर असते. त्यात आतबाहेर आनंद असतो. श्री रामायणामध्ये श्रीराम-सीता प्रथमदर्शनाच्या प्रसंगाचे वर्णन आहे.
सीतेला श्रीरामांचे दर्शन होण्यापूर्वी तिच्या चतुर सखीला श्रीराम-लक्ष्मण उद्यानामध्ये दिसले. तो आनंद काय वर्णावा? ती धावतच सीतेजवळ आली. तिच्या आतबाहेर भरून उरलेला आनंद, डोळ्यांमधले पाणी, अंगावरचे रोमांच आणि धपापणारा उर काही सांगत होता. काय झाले? असे सीतेने विचारल्यावर तिला बोलताच येईना. ती म्हणाली, डोळ्यांनी पाहिले पण त्यांना बोलता येत नाही. वाणी बोलू शकते पण तिने पाहिलेले नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, भगवद् गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवान काय म्हणाले ते सांगणे कठीण आहे. परंतु श्री गुरुकृपेचा अर्थात श्रीनिवृत्तिनाथांच्या कृपेचा दिवा असल्यामुळे बुद्धीला समजायला कठीण असलेलेही तुम्हाला मी सांगू शकेन. श्री गुरुकृपेच्या उजेडात परमार्थाचे सूक्ष्म ज्ञान सांगता येईल. गुरुकृपा झाल्यावर काहीही अशक्य नाही. त्या कृपेमुळे, ‘तेणे कारणे मी बोलेन। बोली अरुपाचे रूप दाविन। अतिंद्रिय परि भोगविन इंद्रियाकरवी?’ सूक्ष्म, अरूप, निराकार, निर्गुण असा परमात्मा मी बोलण्यातून दाखवीन. अतिंद्रिय विषय सामान्यजनांना इंद्रियांकरवी समजावून देईन. माऊलींच्या बोलण्याचे हे सामर्थ्य अगाध आहे. माऊलींबद्दल बोलता येत नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘काय वानू आता। न पुरे ही वाणी। मस्तक चरणी ठेवीतसे?’ ही मौनावस्था आहे.
प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामीमहाराज यांचा एक अभंग आहे, ‘सदा संतांपाशी जावे। त्यांचे जवळी बैसावे। उपदेश ते न देती। तरी ऐकाव्या त्या गोष्टी?’ स्वामी म्हणतात, सदा म्हणजे नेहमीच संतांपाशी जाऊन त्यांच्याजवळ बसावे. त्यांनी आपल्याला जरी काही उपदेश केला नाही तरी ते जे काय बोलतील ते सगळे लक्षपूर्वक ऐकावे. कारण संतांचे ‘सहज बोलणे म्हणजे हितोपदेश.’ ते आपल्या हिताचेच असते. संतांना शिष्यांच्या उद्धाराची तळमळ असते. बोलत बसण्यापेक्षा संतांजवळ श्रवण करावे. ते बोलतात ते लक्षपूर्वक ऐकावे.
संत गुळवणी महाराज हे प.प. टेंबे स्वामींचे शिष्य. ते स्वामी महाराजांच्या सेवेत असतानाची गोष्ट आहे. स्वामी महाराज सकाळी उपनिषदांवर पाठ देत किंवा वेदांताचे ग्रंथ समजावून सांगत. एकदा संत गुळवणी महाराजांनी स्वामींना विचारले, मी ते पाठ, प्रवचने ऐकायला येऊ का? स्वामी म्हणाले, नको, नको. आज खूप लोक जेवायला येणार आहेत. तेव्हा तू पत्रावळी लावायला जा. प. प. स्वामींची आज्ञा तात्काळ जशीच्या तशी प्रतिप्रश्न न करता पालन केल्यामुळे मला ज्ञान झाले असे पूजनीय गुळवणी महाराज म्हणत. त्यातले रहस्य असे आहे की सेवा हा परमधर्म असून सेवेमुळे षडरिपू, अष्टबंध, अष्टपाश, तसेच मल, विक्षेप, आवरण व अहंकार यांनी जड झालेले प्राण शुद्ध व सूक्ष्म होतात. जीवाशिवाची भेट होऊन अखेर ज्ञान होते. सद्गुरू गूढ बोलतात त्यामागे असलेली शिष्याच्या उद्धाराची कळकळ लक्षात घेतली की अर्थाची उकल होते.
सध्याचे जग हे अफाट बोलण्याचे आहे. त्यासाठी काहीही निमित्त व काळवेळ नाही. मनातले बोलून टाकल्याने काही काळ शांतता लाभते हे जरी खरे असले तरी जिथे शब्द अंतर्धान पावतात अशी जागा सापडली की मन आपोआपच रिते होते. ग्रंथ बोलतात, थोपटतात, गप्प करतात आणि वाटा देखील निर्माण करतात. बोलायचे राहून जाणे ही बाब तर नित्याचीच आहे, परंतु बोलण्यासारखे काहीही न उरणे ही गोष्ट फक्त संतसाहित्यात आणि संतसहवासातच लाभते.
प. प. टेंबे स्वामी म्हणतात, ‘संत जे बोलतात। तेचि उपदेश होती। वासुदेव म्हणे संत । संगे करिती पसंत ?’ संत परीक्षा घेऊन, पारखून शिष्याला जवळ घेतात. संतांची संगत लाभणे, त्यांनी पसंत करणे यामुळे जीवत्व लोप पावते. संत तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात, ‘बोलविसी माझे मुखे। परी या जना वाटे दु:ख?’ विठ्ठला, माझ्या मुखाने तूच उपदेश करत आहेस. तो ऐकून लोकांना दु:ख वाटते आहे. रोग्याला कडू काढा नको असतो. खाऊ नको सांगितलेले खाल्ल्याने रोगी जिवाला मुकतो. जन हो, धन, पुत्र, स्त्राr ही माया नरकात लोटते. मी हे उपाय सांगितले, परंतु तुम्हाला जे पसंत असेल ते करा. संतांची संगत केली की त्यांच्या पंगतीचा लाभ होतो. जीव पूर्णत्व पावतो.
-स्नेहा शिनखेडे