देवाधिदेव
आपण आपल्या मुलांसाठी किती जरी केलं तरी ते कमीच असं आपल्याला वाटतं की नाही? तसंच देवाविषयी वाटायला हवं ना? देवाचं लक्ष आपल्याकडे कायम असतंच. आपलं लक्ष देवाकडे नसतं म्हणून रडायची वेळ येते. म्हणून तर देवाला घट्ट धरावयाचे!’ किती मार्मिक भाष्य! देव उमजणं म्हणजे काय ते इथून जाणावं.
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
चालविसी हाती धरोनिया
असं म्हणून निर्धास्तपणे काठीला गाठोडं बांधून जनवनात फिरणाऱ्यांचा त्यांच्या संगतीसोबतीने चालणारा तो देव!
साष्टाङ्गं प्रणति: स्तुतिर्बहुविधा ह्येतत्समस्तं मया
सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो
आत्मा त्वं गिरिजा मति: सहचरा: प्राणा: शरीरं गृहं
पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थिति:
असं म्हणून जिथे असू तिथून शांतपणे बसून मानसपूजा करणाऱ्यांचा तोही देवच..
देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालयी
देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई?
असं विधान गाण्यातून करणाऱ्या गदिमांनी देवाच्या अस्तित्वाचा अगदी सखोल धांडोळा त्याच गीतातून घेतलेला आहे. चराचरात भरून राहिलेलं देवाचं असणं, त्याचं देवत्त्व आणि कालातीत असणारी ती शक्ती, या सगळ्या गोष्टी अवघ्या अकरा ओळीत बसवल्या आहेत. पुन्हा बाबूजींनी आपल्या प्रत्येक स्वरांत त्या यथायोग्य पद्धतीने मांडल्याही आहेत. देवाची हीपण एक बाजूच... तर देवाला फार वेगळ्या पद्धतीने मापणाऱ्या आणि मानणाऱ्या पाडगावकरांनी
कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी
अशी मांडलीय. कारण ते त्याचं निसर्गातील अस्तित्व प्राधान्याने पाहतात. बालमुखातून बोलणारा देव, शेतशिवारातून डोलणारा देव, तर कधीकधी गोळाभर अन्नासाठी आर्त पुकारा करणाऱ्या भिकाऱ्याच्या रूपाने आपली परीक्षा पाहणाराही देवच! ही त्यांची स्वत:ची श्रद्धा आहे. कारण काहीसे डाव्या विचारसरणीकडे झुकलेले आणि व्यर्थ कर्मकांडावर आपल्या लेखणीने आसूड ओढणारे पाडगावकर इथे विलक्षण हळवे होऊन लिहितात. हे लिहिणं नुसतं सौंदर्य नव्हे तर ही एक प्रगल्भ जाणीव आहे. इथेही ती जाणीव आपल्यापर्यंत पोहचवणारे पुन्हा बाबूजीच! स्वरांसोबतच शब्दांचा कमालीचा सूक्ष्म अभ्यास असणारं हे व्यक्तिमत्त्व! ज्यांच्या गीतांना त्यांचे स्वर लाभले ते नक्कीच त्यासाठी त्यांचे ऋणी असतील.
भक्तीची आवड भारी प्रभुला
भक्तीची आवड भारी
रुक्मिणीच्या एका तुळशीदळाने
तुळियेला गिरिधारी
असं सहज म्हणून जाणाऱ्या संत कवयित्री प.पू. कलावतीदेवींच्या चरित्रात एक सुंदर प्रसंग आहे. त्यांच्या भक्त एम. विशालाक्षी यांच्याकडे त्यांचं वास्तव्य असताना एक दिवस त्यांनी विशालाक्षीचं ती देवाला फुलांचा हार घालताना निरीक्षण केलं आणि तिला विचारलं. ‘बागेत फुलं मिळाली नाही तर विकतची का होईना पण फुलं घेऊन त्यांचा हार करून घालतीस. आदल्या दिवशी मिळाली तर दुसऱ्या दिवसापर्यंत ती फुलं ताजी टवटवीत राहावीत म्हणून त्यावर पाणी शिंपडतीस आणि तो ओला हार देवाला घालतीस. त्याला थंडी होईल असं तुला वाटत नाही का गं?’ हे एक वाक्य आपल्या मनाचं छप्पर उडवून जातं. की अरेच्चा! आपण किती निब्बर झालेले असतो. देव चांदीच्या किंवा पितळी मूर्तीत आहे त्यापैकी आपण फक्त चांदी आणि पितळच मानतो? त्यांनी देवाला सखा म्हणलं आहे. देवाचं अस्तित्व जिवंत आहे असं म्हटलंय. पुढे जाऊन त्या म्हणतात की, ‘आपण आपल्या मुलांसाठी किती जरी केलं तरी ते कमीच असं आपल्याला वाटतं की नाही? तसंच देवाविषयी वाटायला हवं ना? देवाचं लक्ष आपल्याकडे कायम असतंच. आपलं लक्ष देवाकडे नसतं म्हणून रडायची वेळ येते. म्हणून तर देवाला घट्ट धरावयाचे!’ किती मार्मिक भाष्य! देव उमजणं म्हणजे काय ते इथून जाणावं.
चंद्रशेखर गोखले हे चारोळीकार म्हणून सर्वांनाच जास्त माहित आहेत. पण ज्यांना त्यांच्या कथालेखनाविषयी तितकी माहिती नसेल तर त्यांच्या कथाही मनापासून वाचाव्यात. मथितार्थ सारखी पुस्तकं प्रसिद्ध आहेतच पण अगदी फेसबुकवरही उपलब्ध आहेत त्यातल्या काही कथा! देवाच्या अस्तित्वाचा त्यांनी अत्यंत सुंदर कौटुंबिक कथेतून मांडलेला लेखाजोखा एकदा वाचला ना, तर गदगदून येईल. एका कथेत एक सुंदर प्रथा दाखवलेली आहे. गौरी पोहचवताना घरातल्या सर्वात नव्या जोडप्याकरवी गणपती गौरीपाठी बाळासारखा चालवतात. म्हणजे आईसोबत जायचा तो हट्ट करतो अशी समजूत आहे. मग त्याची समजूत काढून त्याला पंचपक्वान्नाच्या खाऊच्या लोभाने पाठी आणून परत मखरात बसवतात. तो दमला असेल म्हणून त्याचा घाम सुगंधी शेल्याने पुसतात. त्याच्यापुढे चांदीचा खुळखुळा खुळखुळवतात. तो खुळखुळा नवीन सूनबाईच्या ताब्यात राहतो. तिला बाळ झालं की पुढच्या नवीन सुनेकडे तो दिला जातो. आणि त्यादिवशी त्याला थांबल्याबद्दल खाऊ म्हणून रात्रीला पंचपक्वान्नाचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला जातो. किती सुंदर...देव हा आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे हेच मानून त्याचे खऱ्याखुऱ्या माणसासारखेच लाड करण्याची ही प्रथा ज्यानं कुणी सुरू केली असेल त्याला देव ही संकल्पना किती चांगल्या प्रकारे उमजली असेल ना? आणि या निमित्ताने एक अतिशय महत्त्वाची गोष्ट घडते. ती म्हणजे कुटुंब वर्षात एकदा तरी एकत्र येतं. एकमेकांची चौकशी होते. संवाद होतात. अडचणी, सल कळतात. मदतीची गरज असली तर धावता येतं. कुटुंबात सुसंवाद वाढतो. आणि एकूणच समाजातही! सण उत्सव यांचा मूळ हेतूच तो असतो. म्हणजे सलोखा वाढवणारा, संवादाचा पूल बांधणारा आणि एकत्र आणणारा तोही देवच! या देवाचं असंही एक रूप आहे. गणेशोत्सव नुकताच संपतो आहे. अमुक राजा तमुक महाराजाच्या दर्शनासाठी माणसं रांगेत खा खा धक्के खाऊन आलीयेत. पण स्वत:च्या घरच्या गणपतीपुढे शांतपणे थोडावेळ बसून त्याच्या सुंदर साजिऱ्या रूपाचं डोळेभरून दर्शन घेतलं असेल का हो या धक्के खाणाऱ्या मंडळींनी? की
जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनोकामना पुरती
याचा अर्थ समजून न घेता नुसतंच म्हणून टाळ्या वाजवल्या असतील? बालीच्या नवोदित शिल्पकाराने घडवलेल्या गणपतीच्या मूर्तीचे तपशील बाली दर्शन करायला गेलेल्या पुलंनी चक्क सुखकर्ता दु:खहर्ता ही आरती म्हणून हिशेबून घेतले होते असं त्यांनीच लिहून ठेवलंय. एकदा ते पहिलं कडवं म्हणून बघितलं तरी समजेल आपल्याला. वाचता वाचता मनात म्हणून तर बघाल! ना.धो. ताम्हनकर यांनी ‘गोट्या’, ‘चिंगी’ आणि ‘खडकावरला अंकुर’ ही सुंदर पुस्तकं लिहून बालसाहित्यात अतिशय मोलाची भर घातली आहे. त्यातल्या ‘गोट्या’च्या एका भागात त्याचे मामा आणि आजी लेखकाकडे पाहुणे म्हणून येतात तेव्हा त्यांना गोट्याकडे पाहून स्वत:च्या वारलेल्या भाच्याची आठवण येते. पुढे झालेल्या चर्चेतून त्यांना गोट्या हाच त्यांचा भाचा विश्वास असल्याची सत्य स्थिती उलगडते. त्यावेळी विश्वासची आजी उद्गारते ‘माझ्या लेकराला सख्ख्या काकाने राक्षस होऊन मारलं. पण तुम्ही देव होऊन त्याची राखण केली. माझी प्रभा मोटारीनं मारली. पण विश्वासची आई मेली नाही. देव देव म्हणून कुणी काही वेगळा नसतो हो वैनीबाई! तुमच्यासारख्यांच्या मनीमुखीच तो वसत असतो.’ हे वाक्य वाचत असताना अक्षरश: सिनेमाचा सीन चालू असावा तसा हुबेहूब प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहिला आणि कानाशी भैरवीतली सतार दिडदा दिडदा वाजू लागली होती. देव म्हणजे काय याची अत्यंत सुंदर व्याख्या अल्पशिक्षित परंतु श्रद्धावंत साध्या स्त्राrच्या तोंडून अशी वदवली आहे लेखकाने! अशीच साधी साधी वाक्यं जीवनातल्या विराटाचं एकाएकी दर्शन घडवतात!
उंच उंच आकाशात मानवाच्या कल्पनेपलिकडच्या विश्वात लांब वास्तव्य करणारा देव अशा अनेक ठिकाणी जवळून वावरत असतो. तुमच्या माझ्या माथ्यावर सावली धरत असतो याची आठवण करून द्यायला म्हणूनच तर तो येत नसेल ना वर्षातून एकदा रहायला? गणपती नादभाषा आणि प्रकाशभाषा दोन्हीची देवता असल्यामुळे बाकीचे देव आणि आपण यातला संवाद वाढवण्यासाठीच येत असेल ना तो? एकदा विचारून बघूया का त्यालाच?
अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु